esakal | हिमाचल प्रदेशातील शिखराचे ‘माऊंट गुरुगणेश’ असे नामकरण
sakal

बोलून बातमी शोधा

mount

हिमाचल प्रदेशातील शिखराचे ‘माऊंट गुरुगणेश’ असे नामकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘स्वच्छंद ॲडव्हेंचर फाउंडेशन'च्या गिर्यारोहण संघाने हिमाचल प्रदेश येथील स्पिती खोऱ्याच्या खामेंगार या दुर्गम भागातील सहा हजार १६० मीटर उंचीच्या अनामिक शिखरावरील मोहिम नुकतीच यशस्वीपणे पूर्ण केली. या शिखरावरील ही प्रथम चढाई असल्यामुळे संस्थेला या शिखराचे नामकरण करण्याची संधी मिळाली असून शिखराचे ‘माऊंट गुरुगणेश’ असे नामकरण करण्यात आले आहे.  

अनिकेत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ओमहर्ष जपे, तृप्ती जोशी आणि संवेद मठपती यांनी ही आव्हानात्मक मोहीम पूर्ण केली. या महत्वाकांक्षी मोहिमेसाठी शारीरिक, मानसिक आणि तांत्रिक पद्धतीची पूर्वतयारी करण्यात आली होती.

हेही वाचा: इंग्लंडची चिटींग; रद्द झालेला सामना जिंकून टीम इंडियाशी बरोबरी?

प्रत्येक मोहिमेप्रमाणे या मोहिमेअंतर्गत चार हजार ३८० मीटर उंचीवरील बेसकॅम्प येथे ही गणपतीचे मंदिर उभारण्यात आले. संपूर्ण संघाने यशस्वीपणे ही मोहीम पार पडली. तर संघाचे हे यश गणपती बाप्पाला समर्पित करण्याच्या जाणीवेतून या शिखराला ‘माऊंट गुरुगणेश’ हे नाव देण्याचे ठरविले. असे कुलकर्णी यांनी सांगितले.  

या मोहिमेबाबत कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘‘मोहिमेच्या काही दिवस आधी कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यामुळे संपूर्ण देशात निर्बंध लागू करण्यात आले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत मोहीम करता येईल की नाही याबद्दल शंका होती. त्याचबरोबर प्रत्यक्ष मोहिमेच्या काळात हे शिखर सर करताना अनेक अडचणी आल्या.

हेही वाचा: रुफटॉप सौर ऊर्जा यंत्रणेवर केंद्र शासनाकडून ४० टक्के अनुदान

काही ठिकाणी खळखळत वाहणाऱ्या व हाडे गोठवणाऱ्या पाण्याचे प्रवाह पार करावे लागले. तर काही ठिकाणी भुसभुशीत बर्फात मांडीपर्यंत पाय फसत होते. अतिशय प्रतिकूल हवामान, उणे तापमान, शिखर माथ्याजवळील १०० फूट उंचीची हिमभिंत आणि २०० मीटरचा अतिशय अवघड आणि धोकादायक टप्पा अशा अनेक संकटांवर मात करत संपूर्ण संघाने शिखरमाथा गाठला.’’

स्थानिक घोडेवाल्यांची मदत :

मोहिमेच्या अतिशय दुर्गम भागात अनाहूतपणे स्थानिक घोडेवाले भेटले. त्यांनी सामान वाहण्यास मदत केली. बर्फाचा पूल सापडणे, मोहिमे दरम्यान निसर्गाची उत्तम साथ आणि शिखर गाठताना स्वच्छ हवामान मिळणे हे आकस्मिक योगायोग या मोहिमेदरम्यान संघाला अनुभवास आले.

loading image
go to top