
Hindenburg चा अहवाल 'कॉपी पेस्ट' कुठलाही रिसर्च नाही; अदानी ग्रुपचा दावा
नवी दिल्ली : हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालामुळं अदानी ग्रुपच चांगला अडचणीत आला असून शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली होती. त्यामुळं गौतम आदानी श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर ढकलेले गेले होते. यापार्श्वभूमीवर अदानी समुहानं आज या अहवालावर आपली भूमिका मांडली. दरम्यान, हिंडेनबर्गचा अहवाल कॉपी पेस्ट असून यात कुठलाही रिसर्च केलेला नाही, असा दावा अदानी ग्रुपनं केला आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Hindenburg Report Copy Paste No Research claims by Adani Group)
अदानी ग्रुपचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर (CFO) जुगेशिंदर सिंग यांनी अमेरिकेनं कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चवर हल्लाबोल केला. म्हणाले, "या कंपनीनं आपला अहवाल तयार करण्यासाठी कुठलाही रिसर्च केलेला नाही, त्यांनी आमचे डिस्क्लोजर्स केवळ कॉपी पेस्ट केले आहेत" हिंडेनबर्गला प्रश्न विचारला गेला पाहिजे की, त्यांनी आपल्या अहवालात तथ्यांना चुकीच्या पद्धीनं का दाखवलं आहे? आणि सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल केली आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चनं उपस्थित केलेल्या ८८ प्रश्नांची उत्तर त्यांना देण्यात आली आहेत. यांपैकी ६८ प्रश्न तर बोगस आणि चुकीच्या पद्धतीनं तयार केलेत. त्यांनी कुठलाही रिसर्च केलेला नाही. त्यांनी केवळ कट-कॉपी-पेस्ट असं काम करत आपला रिपोर्ट बनवला आहे. उर्वरित २० प्रश्नांपैकी काही प्रश्न बोगस आहेत. आम्ही करु पण आम्ही खोटं स्विकारणार नाही. यामध्ये एखाद्याच्या वैयक्तिक कौटुंबिक कार्यालयाबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत. ज्याची आम्ही उत्तरं देऊ शकत नाही. आम्हाला जेवढे शक्य झाले तेवढ्यांची उत्तर आम्ही दिली आहेत, असंही सिंग यांनी सांगितलं.
अदानी ग्रुपच्या उत्तराला हिंडेनबर्गचं प्रत्युत्तर
अदानी ग्रुपच्या सीएफओंच्या या मुलाखतीनंतर लगेचच, हिंडेनबर्ग रिसर्चनं त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे, राष्ट्रवादाच्या नावाखाली फसवणूक केली जाऊ शकत नाही तसेच आम्ही उपस्थित केलेल्या प्रत्येक मुख्य आरोपांकडं दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समुहात अनेक अडचणी असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर अदानींचे स्टॉकमध्ये मोठी पडझड झाली. त्यामुळं त्यांच्या संपत्तीत घट झाल्यानं ती थेट ११३ अब्ज डॉलरवर आली आहे. त्यामुळं जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत.