Hindu Muslim Unity : अजानच्या वेळी मंदिर करतो लाऊडस्पीकर बंद; तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu Muslim unity

हिंदू-मुस्लिम एकता : अजानच्या वेळी मंदिर करतो लाऊडस्पीकर बंद; तर...

मागील काही दिवसांपासून मशिदींवरील भोग्यांवरून (loudspeaker) राजकारण सुरू आहे. यामुळे कुठे लाऊडस्पीकर काढण्यात येत आहे तर कुठे याला विरोध करण्यात येत आहे. याचे राजकारण करून वातावरण खराब करण्याचे काम केले जात आहे. मात्र, बिहारची राजधानी पाटणा येथे ५० मीटर अंतरावर असलेले मंदिर आणि मशीद (Mosque) एकमेकांच्या प्रार्थना आणि समारंभांचा आदर करून जातीय सलोख्याचे उदाहरण देत आहेत. (Hindu Muslim unity)

सामाजिक आणि सांप्रदायिक सलोखा असा आहे की, अजानच्या वेळी मंदिर लाऊडस्पीकर बंद करते, तर मशीद मंदिरात येणाऱ्या भक्तांची काळजी घेते. हे मंदिर पाटणा स्टेशनजवळील महावीर मंदिर आहे तर त्याच्यापासून ५० मीटर अंतरावर न्यू मार्केटमध्ये पाटणा मशीद आहे. मंदिर आदर म्हणून अजान दरम्यान लाऊडस्पीकर बंद करते. रामनवमीनिमित्त मंदिरात आलेल्या भाविकांना मशिदीने शरबत वाटप केल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पाटणा मशिदीचे अध्यक्ष फैसल इमाम यांनी सांगितले.

रामनवमीच्या दिवशी मंदिरात आलेले भाविक मशिदीसमोर रांगेत उभे असताना त्यांना शरबत वाटप केले. मंदिरातील लाऊडस्पीकरवर (loudspeaker) दिवसभर भजन-कीर्तन वाजत होते. परंतु, अजानच्या वेळी ते बंद केले होते, असेही फैसल इमाम यांनी सांगितले. आम्ही अनेकदा एकमेकांना मदत करतो आणि बंधुभाव राखतो. आम्हाला ना अजानमध्ये काही अडचण आहे ना त्यांना भजन-कीर्तनाची काही अडचण आहे, असे पाटणाच्या महावीर मंदिराचे अध्यक्ष किशोर कुणाल यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप (BJP) सरकारच्या सूचनेनुसार रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवरून ५३,९४२ लाऊडस्पीकर हटवण्यात आले. या घोषणेपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या महिन्याच्या सुरुवातीला धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या (loudspeaker) आवाजावर मर्यादा घालण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील सुमारे २२ हजार अनधिकृत लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात १३ एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मे पर्यंत मशिदींतील (Mosque) लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.