'हिज्बुल', 'लष्करे'चे सहा दहशतवादी ठार

'हिज्बुल', 'लष्करे'चे सहा दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी आज दहशतवाद्यांविरोधात आक्रमक कारवाई करीत 
"लष्करे तय्यबा' आणि "हिज्बुल मुजाहिद्दीन' या संघटनांशी संबंधित सहा दहशतवाद्यांना ठार मारले. या मृत दहशतवाद्यांमध्ये पत्रकार शुजात बुखारी यांच्या खून प्रकरणातील मोस्ट वॉंटेड आझाद मलिक याचादेखील समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चालू वर्षातील ही भारतीय लष्कराची सर्वांत यशस्वी कारवाई मानली जात आहे. यंदा चौदा जून रोजी "रायझिंग काश्‍मीर' या दैनिकाचे संपादक असलेल्या बुखारी यांची अज्ञात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. 

दक्षिण काश्‍मीरमधील बिजबेहरा भागात आज सकाळी सुरक्षा दलांनी या सर्व दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले. या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून, ऊनाएस शाही, शाहीद बशीर, बासित इश्‍तीयाक, आकिब नझर आणि फिरदोस नझर अशी त्यांची नावे असून, ते याच भागातील स्थानिक रहिवासी आहेत. अनेक गंभीर गुन्ह्यांप्रकरणी पोलिस आणि सुरक्षा दले या दहशतवाद्यांच्या मागावर होती. 

रात्रीपासून शोध मोहीम 

या भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी गुरुवारी रात्रीच वागाहामा सुक्तीपुरा टेकड्यांच्या पायथ्याशी शोध मोहीम सुरू केली होती. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने पुढे याच शोध मोहिमेचे रूपांतर चकमकीत झाले. दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. 

एकत्रित गट 

हिज्बुल मुजाहिद्दीन, लष्करे तय्यबा या दहशतवाद्यांचा एकत्रित गट अनेक दिवसांपासून काश्‍मीर खोऱ्यामध्ये सक्रिय होता, असे पोलिस रेकॉर्डवरून दिसून येते. सुरक्षा दलेही याच दहशतवाद्यांच्या मागावर होती. या चकमकीत ठार झालेला आझाद अहमद मलिक ऊर्फ आझाद दादा हा अनंतनागमध्ये लष्करे तय्यबाचे नेतृत्व करत होता. यंदा एप्रिल महिन्यामध्ये तो बालंबाल बचावला होता. बुखारींच्या हत्येचा कट आखणाऱ्या नावीद जट्ट याचा तो निकटचा सहकारी म्हणून ओळखला जात असे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com