वाढदिवशीही अडवानींची मौनाचीच भाषांतरे! 

Lal Krishna Advani
Lal Krishna Advani

नवी दिल्ली : दिल्लीत आज विषारी हवेमुळे सूर्यदर्शन झाले नाही. या कुंद वातावरणात दिल्लीच्या 30, पृथ्वीराज रस्त्यावर संसदेतील एका सर्वांत ज्येष्ठ नेत्याचा नव्वदावा वाढदिवस साजरा होत होता... मात्र आजही केवळ नेहमीसारखे हातात हात गुंफून मौनातूनच बोलणाऱ्या या नेत्याच्या मौनाची भाषांतरे करण्यास कोणीही समर्थ नव्हते...

सत्तेच्या प्रकाशात आज आकंठ बुडालेल्या भारतीय जनात पक्षाला पहिल्यांदा सत्तासूर्य दाखविणारे आणि आता तो सत्तासूर्य भाजपच्याच अंगणात तळपत असूनही त्यापासून अलिप्त राहणारे वा दूरच ठेवले गेलेले पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी यांचा 90 वा वाढदिवस आज साजरा झाला, तेव्हा दिल्लीतल्या आजच्या वातावरणासारखाच आसमंताला वेढून टाकणारा एक कुंदपणा उपस्थितांच्या मनीमानसी अस्वस्थता आणणारा ठरत होता. 

अडवानींच्या या मौनाची भाषांतरे करण्याचे सामर्थ्य एकाही भाजप नेत्याकडे नसावे आणि स्वतः अडवानी ते कदाचित, "हर घडी बदल रही है, धूप जिंदगी, छाव है कही कही है धूप जिंदगी...' या गाण्याच्या अखेरच्या ओळी मनात गुणगुणत असावेत. अडवानींच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या निवासस्थानी फुलांची सजावट करण्यात आली होती आणि जनतेलाही ते भेटणार असे जाहीर केले होते. एका चाफ्याच्या झाडाखाली शांतपणे बसलेले अडवानी येणाऱ्यांच्या शुभेच्छा मौनातूनच स्वीकारत होते. त्यांच्या कन्या प्रतिभा व जीवनभर साथसोबत करणारे दीपक चोप्रा अडवानींबरोबर सावलीसारखे उभे होते. 

गेली अनेक वर्षे अडवानींच्या वाढदिवशी भाजप मुख्यमंत्री, खासदार यांची एकच गर्दी येथे होत असे. इतकी की गाड्यांच्या गर्दीने हा रस्ता बंद करावा लागत असे. आज मात्र ती सारी गर्दी ओसरून फक्त सामान्य भाजप कार्यकर्ते व माजी महापौर आरती मेहेरांसारखे तुरळक स्थानिक नेतेच येथे दिसत होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी खास अहमदाबादहून येत असत. त्याच नरेंद्र मोदी यांनी प्रधानसेवक झाल्यावर यंदा मात्र शुभेच्छांसाठी ट्विटरचा आधार घेतला. 

शुभ्र कुर्ता, धोतर, निळे जॅकेट अशा वेशातील अडवानींनी आज सकाळी लोधी रस्त्यावरच्या अंधशाळेतील 90 मुलांसोबत वाढदिवस साजरा केला व त्यांना स्कूलबॅग भेट दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे अडवानींना शुभेच्छा दिल्या. उपपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मंत्री विजय गोयल, जयंत सिन्हा, जदयू नेते शरद यादव, खासदार किरण खेर, मनोज तिवारी, शत्रुघ्न सिन्हा, श्‍याम जाजू आदी अनेकांनी अडवानींना भेटून शुभेच्छा दिल्या. मोदी सरकारवर टीकास्त्र सोडणारे अडवानी काळातील अर्थमंत्री यशवंत सिन्हा खास त्यांच्यासाठी दिल्लीत आले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेक एनडीए नेत्यांनीही अडवानींना खास दूरध्वनी केले. छोट्या मुलांशी मात्र ते खुलून बोलत होते. दुपारी येथे आलेले सोनू निगम यांनी अडवानींसाठी काही गाणी गायली. यात अडवानी स्वतः मात्र बोलण्यापासून कटाक्षाने दूर रहात असल्याचे सातत्याने जाणवत होते. ते ज्या झाडाखाली बसले होते त्या चाफ्याच्या झाडाला फुलांच्या माळांची सजावट केली गेली होती; मात्र तो चाफा फुले न येणारा होता... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com