'या' भाजप नेत्यानं PM मोदींनाही दिला नाही भाव; नड्डांवर टीका करत घेतला निवडणूक लढवण्याचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Himachal Pradesh Assembly Election

मोदी भावनिक ब्लॅकमेल करत असून भाजप नेत्यावर अपक्ष उमेदवार म्हणून न लढण्यासाठी दबाव आणत आहेत.

'या' भाजप नेत्यानं PM मोदींनाही दिला नाही भाव; नड्डांवर टीका करत घेतला निवडणूक लढवण्याचा निर्णय

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Himachal Pradesh Assembly Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या एका फोन कॉलनं कांगडा जिल्ह्यातील (Kangra District) फतेहपूर ही जागा चर्चेच्या केंद्रस्थानी आणलीय. भाजपनं सध्या नूरपूरचे आमदार असलेले राकेश पठानिया यांना उमेदवारी दिलीय.

दरम्यान, माजी राज्यसभा सदस्य कृपाल परमार (Kripal Parmar) हे या जागेवरून तिकिटासाठी आघाडीवर होते. परंतु, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्यामुळं त्यांची सहा वर्षांसाठी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती. आता परमार उघडपणे भाजपच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना परमार म्हणाले, “पीएम मोदींसोबत माझे 25 वर्षे जुने नाते आहे. मी त्यांना देव मानतो. पण, मी निवडणूक लढवत आहे. जेव्हा पंतप्रधान मोदींचा फोन आला, तेव्हा मी माझा उमेदवारी अर्ज भरला होता आणि अर्ज मागं घेण्याची वेळही संपली होती. त्यांचा फोन एक दिवस आधी आला असता तर मी लगेच उमेदवारी मागं घेतली असती. मी ही निवडणूक सोडली असती, तर माझ्या नावावर 10-20 मतं पडली असती आणि मला कलंक लागला असता. त्यामुळं माझ्याकडं पर्याय नव्हता."

हेही वाचा: काँग्रेसनं मुलाला तिकीट नाकारलं; आमदारानं थेट भाजपातच केला प्रवेश, शंभर टक्के तिकीट मिळण्याचीही दिली ग्वाही

तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार - परमार

परमार पुढं म्हणाले, "पीएम मोदींना सांगण्यात आलं की, मला पूर्णपणे संपवण्याचा हा कट होता. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यासोबत हेच घडत होतं. हायकमांडनंही माझं ऐकलं नाही. मी जेपी नड्डांना आधीच सांगितलं होतं की, तुम्ही तिकीट दिलं नाही तरी मी निवडणूक लढवणार आहे. 2017 ची निवडणूक अवघ्या 1,284 मतांच्या फरकानं पराभूत होऊनही, प्रदेश भाजप नेतृत्वानं मला बाजूला केलं. 2001 च्या पोटनिवडणुकीत मला तिकीट मिळेल अशी आशा होती, पण पक्षानं पुन्हा माझ्याकडं दुर्लक्ष करून बलदेव ठाकूर यांना तिकीट दिलं."

हेही वाचा: अडीचशे ग्रॅम दारू पिणाऱ्यांना पकडू नका; दोन पेग दारू पिणं चुकीचं नाही; असं का म्हणाले माजी मुख्यमंत्री?

नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यावर दबाव

काँग्रेसनं नुकतीच ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप जारी केल्यानंतर वादाला तोंड फुटलं आहे. परमार यांच्याशी झालेल्या संभाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज ऐकू येत असल्याचा दावा पक्षानं केलाय. यामध्ये मोदी भावनिक ब्लॅकमेल करत असून भाजप नेत्यावर अपक्ष उमेदवार म्हणून न लढण्यासाठी दबाव आणत आहेत, असं म्हटलंय.

हेही वाचा: बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम