अस्तित्वात नसलेल्या 'जिओ'वर जावडेकरांचा 'जीव'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जुलै 2018

पहिल्या टप्प्यात सहाच संस्था
जावडेकर यांनी मागील वर्षी २० प्रतिष्ठित शिक्षण संस्थांची निवड करण्याची घोषणा केली होती व त्यासाठी तज्ज्ञांची समितीही नियुक्त केली होती. या समितीचे अध्यक्ष व माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी सांगितले, की २० प्रतिष्ठित संस्थांची निवड करायची असली, तरी तूर्तास, पहिल्या टप्प्यात सहाच संस्था दर्जाच्या कसोटीवर उतरल्या आहेत.

नवी दिल्ली - भारतातील उच्चशिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘प्रतिष्ठित शिक्षण संस्थां’च्या उपक्रमात पहिल्या २० संस्थांपैकी आज जाहीर झालेल्या पहिल्या सहा संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश झाला आहे. त्यानुसार मुंबई आयआयटीला पुढील पाच वर्षांत केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी मिळणार आहे. यातील खासगी संस्थांपैकी पहिल्या तीन प्रतिष्ठित संस्थांमध्ये रिलायन्स उद्योग-समूहाच्या जिओ इन्स्टिट्यूटचे नाव आहे. मात्र, या संस्थेचे कामकाज अद्याप सुरूही झालेले नाही.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ट्‌विट करून पहिल्या सहा प्रतिष्ठित शिक्षण संस्थांच्या निवडीची (इन्स्टिट्यूशन ऑफ एमिनन्स) घोषणा केली. या पूर्ण प्रक्रियेमध्ये देशातील दहा सरकारी व दहा खासगी अशा २० उच्चशिक्षण संस्थांची निवड करण्यात येणार आहे. त्यातील सहा आज जाहीर झाल्या. उर्वरित संस्थांची नावे टप्प्याटप्प्याने जाहीर होतील. हा दर्जा मिळविण्यासाठी १०० शिक्षण संस्थांनी केंद्राकडे अर्ज केले आहेत. आज निवड झालेल्या तीन सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुंबईबरोबरच आयआयटी दिल्ली आणि आयआयएससी बंगळूर यांचा, तर खासगी क्षेत्रात ‘जिओ’बरोबरच मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन (कर्नाटक) व बिट्‌स पिलानी (राजस्थान) या संस्थांचाही समावेश आहे.

जगातील दर्जेदार २०० विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये भारतातील एकाचाही समावेश नसल्याने केंद्र सरकारने भारतातील शैक्षणिक संस्थांना जागतिक मानांकन मिळवून देण्याचा विडा उचलला आहे. 

पहिल्या टप्प्यात सहाच संस्था
जावडेकर यांनी मागील वर्षी २० प्रतिष्ठित शिक्षण संस्थांची निवड करण्याची घोषणा केली होती व त्यासाठी तज्ज्ञांची समितीही नियुक्त केली होती. या समितीचे अध्यक्ष व माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी सांगितले, की २० प्रतिष्ठित संस्थांची निवड करायची असली, तरी तूर्तास, पहिल्या टप्प्यात सहाच संस्था दर्जाच्या कसोटीवर उतरल्या आहेत.

Web Title: HRD minister Prakash Javdekar JIO institute Mumbai IITs in reputed institutes