Hug Day 2023 : एकमेकांना भेटण्यासाठी तडपणारे लैला-मजनू मृत्यूनंतर एक झाले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hug Day 2023

Hug Day 2023 : एकमेकांना भेटण्यासाठी तडपणारे लैला-मजनू मृत्यूनंतर एक झाले!

जगात एक काळ असा होता जेव्हा प्रेम करणे गुन्हा मानला जात होता. प्रतिष्ठेच्या नावाखाली लोकांना प्रेम करण्यापासून रोखले जात होते. त्याच काळात घडलेली एक प्रेम कथा अजरामर झाली आहे.

अरबस्तानातील अब्जोपती शाह अमारी नावाच्या व्यक्तीचा मुलगा कॅसला (मजनू) लहानपणापासूनच प्रेमाचा स्पर्श झालेला. कारण, त्याच्या हातावरच्या रेषाच तशा होत्या. एका ज्योतिषाने त्याला पाहताक्षणी सांगितलं याच्या आयुष्यात प्रेमाला फार महत्त्व आहे. त्यासाठी तो काहीही करेल. ज्योतिषाची भविष्यवाणी खोटी ठरावी यासाठी शाह अमारीने खूप प्रयत्न केले. पण ते सारे व्यर्थ ठरले.

कॅस जेव्हा दमास्कसमध्ये मदरशात शिकण्यासाठी गेला. तेव्हा त्याने नाजदच्या शहाची मुलगी लैला हिला पाहिलं. तिथेच तो तिच्या प्रेमात पडला. मौलवीने त्याला प्रेम बिम झूठ असल्याचं सांगून त्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर असं सांगतिलं. पण प्रेमात आकंठ बुडालेला कॅस ऐकायला कसा तयार होईल?

त्याच रोगाची लागण लैलालाही झाली. पुढे याची परिणती लैलाला घरात कोंडून ठेवण्यात झाली. लैलाचा विरह कॅसला सहन होईना. तो वेड्यासारखा भटकू लागला. त्याचे हे प्रेम पाहून लोकांनी त्याला मजनू म्हणायला सुरवात केली. ते नाव आजही टिकून आहे.

लैला व मजनू यांना वेगळे करण्याचे खूप प्रयत्न झाले. पण निष्फळ ठरले. लैलाचे बख्त नावाच्या व्यक्तीशी लग्न लावून देण्यात आले. पण तिने नवर्‍याला आपण फक्त मजनूचे आहोत, असे स्पष्ट सांगितले. त्याच्याशिवाय आपल्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही, असे सांगितले.

बख्तने तिला तलाक दिला. आता मजनूच्या प्रेमाने वेडी झालेली लैला त्याच्या शोधात जंगलात फिरू लागली. अखेरीस तिला मजनू मिळाला तेव्हा दोघेही प्रेमपाशात बद्ध झाले. पण लैलाच्या आईने त्यांना वेगळे केले आणि लैलाला ती घरी घेऊन गेली.

विरहाच्या दुःखानेच लैलाचा मृत्यू झाला. लैलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर मजनूचेही जीव सोडला. त्याच्यानंतर त्या दोघांच्या प्रेमाची प्रचिती लोकांना आली. त्यामुळे अखेर त्या दोघांना शेजारीच दफन करण्यात आले.

लैला-मजनूच्या प्रेमाची साक्ष देणारी समाधी राजस्थानमधील बिजनौर (ता. अनुपगढ, जि. श्रीगंगानगर) या गावी अस्तित्वात आहे. या गावी दर वर्षी १५ जून रोजी यात्रा भरते. यात्रेच्या ठिकाणी आसपासच्या गावातले-शहरांतले प्रेमी युगुल जमतात. प्रेमाची व एकसाथ राहण्याची शपथ घेतात. त्यांची अशी श्रद्धा आहे की, लैला-मजनूचे प्रेम मान्य नसल्याने त्यांचा जीव घेण्यात आला व तो दिवस १५ जूनचा होता.