
धक्कादायक! एकत्र नांदण्याचा निर्णय झाल्यानंतर पतीने कोर्टातच केली पत्नीची हत्या
बंगळुरू - कर्नाटकातील हसन जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नी वाद मिटल्यानंतरही पतीने न्यायालयाच्या आवारातच पत्नीची गळा चिरून हत्या केली. यामुळे न्यायालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती. शिवाय मुलीला मारण्याचाही आरोपीने प्रयत्न केला. सुदैवाने तेथे उपस्थित लोकांनी मुलीला वाचवले आणि आरोपीला पकडले. (husband murder wife in court news in Marathi)
सविस्तर माहिती अशी की, घटना हसन जिल्ह्यातील होलेनरासीपुरा टाऊन कोर्ट कॉम्प्लेक्स येथील आहे. थत्तेकेरे गावात राहणारी चैत्रा आणि तिचा पती शिवकुमार यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू होता. शिवकुमार हे होलेनरासीपुरा तालुक्यातील रहिवासी आहेत. घटनेच्या काही वेळापूर्वी दोघांमध्ये कोर्टात समुपदेशनाच्या माध्यमातून बोलणे झाले होते. त्यात दोघांनी एकत्र राहण्याचे मान्य केले होते.
आरोपी शिवकुमारला त्याची पत्नी चैत्रा आणि मुलीला घेऊन त्याच्या घरी जायचे होते. मात्र घरी जाण्यापूर्वीच कोर्टाच्या आवारातच शिवकुमार याने पत्नीचा गळा चिरून खून केला. पत्नीला मारण्यापूर्वी शिवकुमार पत्नीच्या मागे वॉशरूममध्ये गेला. तिथे त्याने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला. पत्नीची हत्या केल्यानंतर तो मुलीला मारण्याच्या प्रयत्न होता. मात्र त्याला उपस्थितांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
चैत्राला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिच्या गळ्यावर खोलवर जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवकुमार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीने न्यायालयाच्या आवारात शस्त्राची व्यवस्था कशी केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हसन येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिराम शंकर म्हणाले, “ही घटना न्यायालयाच्या आवारात घडली. आरोपी आमच्या ताब्यात आहेत. हत्येसाठी वापरलेले हत्यार आम्ही जप्त केले आहे. समुपदेशनानंतर दोघांमध्ये काय झाले आणि तो न्यायालयात शस्त्र आणण्यात कसा यशस्वी झाला याचा तपास करू, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.