'हैदराबाद मेट्रो'चे मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

'हैदराबाद मेट्रो'चे मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

हैदराबाद : वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे हैराण झालेल्या हैदराबादवासीयांचे मेट्रोचे स्वप्न आज पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो सेवेचे उद्‌घाटन करत ती राष्ट्राला अर्पण केली. पहिल्या टप्प्यात मियापूर ते नागोल दरम्यानचा 30 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून, या मार्गावर 24 स्थानके आहेत. मियापूर स्थानकावर पंतप्रधानांच्या हस्ते या सेवेचे उद्‌घाटन केल्यानंतर त्यांनी मेट्रोतून प्रवासही केला. या वेळी त्यांच्यासोबत तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि अन्य मंत्री व वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

आज विशेष विमानाने पंतप्रधानांचे बेगमपेट विमानतळावर आगमन झाले. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ते पुढे मियापूर रेल्वे स्थानकावर पोचले. येथे त्यांचे माहिती तंत्रज्ञानमंत्री के. टी. रामाराव आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केले. पंतप्रधानांनी मेट्रोचच्या प्रवेशद्वाराचे उद्‌घाटन केल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या अन्य मान्यवरांनी स्थानकामध्ये प्रवेश करत रिबन कापून पुढील समारंभ पार पाडला. हैदराबादेतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम 2012 मध्ये सुरू झाले होते, ते यंदा जूनमध्ये पूर्ण झाले.

पॉवरपॉइंट सादरीकरणाची पाहणी
पंतप्रधान मोदी हे लिफ्टमधून रेल्वे स्थानकाच्या वरच्या मजल्यावर गेले. येथे त्यांनी पॉवरपॉइंट सादरीकरण पाहिले आणि "टीसवारी' या ऍपचेही उद्‌घाटन केले. यानंतर मोदींनी मियापूर ते कुकाटपल्ली या दोन स्थानकांदरम्यान प्रवासही केला. विशेष म्हणजे या वेळी मेट्रोची धुरा एका महिला चालकाने सांभाळली. मोदींसमवेत गाडीमध्ये मुख्यमंत्री, राज्यपाल, भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण, भाजपचे सभागृह नेते जी. किशन रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर मोदी, मुख्यमंत्री चंद्रशेखरराव आणि राज्यपाल विशेष हेलिकॉप्टरने हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे ग्लोबल आंत्रप्रिन्योअरशिप समिटमध्ये (जीईएस) सहभागी होण्यासाठी रवाना झाले.

इव्हान्काचे जंगी स्वागत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हान्का ट्रम्प यादेखील नवउद्योजकांच्या संमेलनामध्ये सहभागी होणार असून, आज सकाळीच त्यांचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. इव्हान्का या ट्रम्प यांच्या विश्‍वासू सल्लागार म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांच्यासोबत 350 जणांचे एक शिष्टमंडळदेखील भारतात आले आहे. या शिष्टमंडळामध्ये ओबामा प्रशासनातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com