विद्यार्थिनीला दिली मुलांच्या स्वच्छतागृहात उभे राहण्याची शिक्षा

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

ट्‌विट
सदर प्रकार हा संतापजनक व अमानवी असून, हे प्रकरण राज्याचे उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याकडे नेऊन संबंधितांवर योग्य कारवाईची मागणी मी करणार आहे.
- के. टी. रामा राव, माहिती व तंत्रज्ञान मंत्री

हैदराबादमधील प्रकार; चौकशीचे आदेश

हैदराबाद: शाळेचा गणवेश परिधान करून न आल्याबद्दल एका विद्यार्थिनीला मुलांच्या स्वच्छतागृहात उभे राहण्याची अजब शिक्षा दिल्याचा प्रकार तेलंगणमध्ये समोर आला आहे.

आर. सी. पुरम भागात असलेल्या एका शाळेत हा प्रकार घडला. पाचवी इयत्तेत शिकणारी मुलगी काही कारणास्तव नियमित कपडे परिधान करून शाळेत आली होती. यामुळे संतप्त झालेल्या एका शिक्षकेने तिला ओढत नेऊन मुलांच्या स्वच्छतागृहात पाच मिनिटे उभे राहण्याची शिक्षा केली. सदर शिक्षिका काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. आठवड्यातून किमान एकदा तरी तिला नियमित ड्रेस परिधान करून शाळेत येण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती आम्ही तिच्याकडे असलेल्या डायरीमध्ये केली होती. त्याकडे शिक्षिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला. तर आपण फक्त तिला जाब विचारला होता, असे काही झालेले नाही, असे स्पष्टीकरण संबंधित शिक्षिकेने दिले आहे.

या प्रकारावरून इतर मुलांच्या पालकांनी शाळेत एकत्र संताप व्यक्त करत संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, याची दखल घेत राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Web Title: hyderabad news the student to stand in the children's toilet