भारतीय युवक मैत्रिणीच्या शोधात निघाला अन् पाकमध्ये अडकला...

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

एका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या युवकाचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मैत्रिणीचा शोध घेण्यासाठी गेला अऩ् बेपत्ता झाला. तब्बल 31 महिन्यानंतर तो जीवंत असल्याचे समजले असून, पाकिस्तानमधील पोलिस चौकीत कैद असल्याची माहिती पुढे आली आहे.

हैदराबादः एका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या युवकाचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मैत्रिणीचा शोध घेण्यासाठी गेला अऩ् बेपत्ता झाला. तब्बल 31 महिन्यानंतर तो जीवंत असल्याचे समजले असून, पाकिस्तानमधील पोलिस चौकीत कैद असल्याची माहिती पुढे आली आहे.

अभियंता प्रशांत वैंदम (वय 30) हा पाकिस्तानमधील बहावलपूर येथील पोलिसांच्या ताब्यात आहे. पाकिस्तानने त्याला भारतीय गुप्तहेर असल्याच्या संशयाखाली अटक केली आहे. प्रशांतला टीव्हीवर पाहून आनंद झाला आहे, अशी माहिती त्याचे वडील बाबूराव वैंदम यांनी दिली.

बाबूराव वैंदम म्हणाले, 'प्रशांत हा स्वभावाने खूपच शांत आहे. प्रशांत 11 एप्रिल 2017 मध्ये कंपनीमध्ये कामासाठी गेला होता. परंतु, कामावरून तो परतलाच नाही. खूप शोधा शोध घेतली परंतु तो आढळला नाही. अखेर 29 एप्रिल 2017 रोजी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. एवढ्या वर्षात त्याचा काहीच शोध लागला नाही. पण, काल टीव्हीवर बातम्यामध्ये प्रशांतला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याची माहिती दाखवण्यात आली. शिवाय, त्याचा व्हिडिओही दाखवला गेला. तो तेलगू भाषेमध्ये बोलला. प्रशांत जीवंत असल्याचे पाहून आम्हाला खूप आनंद झाला. प्रशांत गुप्तहेर नाही. एका युवतीच्या प्रेमात तो पडला होता. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार आहे.'

प्रशांत सोबत कंपनीमध्ये काम करत असलेल्या महिला सहकाऱयाने प्रशांतच्या वडिलांना सांगितले की, 'प्रशांत एका युवतीच्या प्रेमात पडला होता. स्वित्झर्लंड येथे असल्याचे त्याला माहित होते. तिला भेटण्यासाठी तो गेला आणि बेपत्ता झाला.'

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'पाकिस्ताने दोन युवकांना गुप्तहेर असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान प्रशांत हा मैत्रिणीला भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला निघाला होता. पण, पाकिस्तानमध्ये कसा आलो हे माहित नसल्याचे त्याने सांगितले. पाकिस्तानने प्रसारीत केलेल्या व्हिडिओमध्ये प्रशांतने तेलगू भाषेत म्हटले आहे की, पाकिस्तानने मला ताब्यात घेतले आहे. कधी आणि कुठे घेतले हे समजले नाही. पण, मला एक महिन्यानंतर सोडतील अशी अपेक्षा आहे. दुसरा युवक हा मध्य प्रदेशातील आहे. दोन्ही युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. दोघांनी घुसखोरी करून पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याची वृत्त दिले आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hyderabad techie lover arrested in pakistan