हायपरलूप ट्रेन हिरव्या कंदीलाच्या प्रतीक्षेत...
हायपरलूप ट्रेन हिरव्या कंदीलाच्या प्रतीक्षेत...

हायपरलूप ट्रेन हिरव्या कंदीलाच्या प्रतीक्षेत...

वेग हाच सध्याच्या जगाचा कानमंत्र आहे. "टू जी', "थ्री जी' करत जग आता "फाइव्ह जी'च्या उंबरठ्यावर आले आहे. या अतिवेगवान जगात वेळेचे मूल्य सर्वाधिक आहे. जलद वाहतूक, दळणवळण हीच आर्थिक विकासाची परिणामे ठरत आहेत. आग पेटवण्याचे तंत्र मानवाने शोधले. त्यानंतर चाकाचा शोध लागला. तंत्रज्ञानाला गती मिळाली. ती आता इंटरनेट क्रांतीपर्यंत येऊन ठेपली. बैलगाडी - मोटार - रेल्वे - बुलेट ट्रेन ते विमान या प्रवासात त्याने वेगवाढीलाच पहिली पसंती दिली. हायपरलूप ट्रेनच्या माध्यमातून या वेगालाही मागे टाकणारे नवीन तंत्रज्ञान संशोधकांनी यशस्वी केले आहे. हायस्पीड ट्रेनचे महत्त्व सरकारच्याही लक्षात आल्याने या ट्रेनच्या बाबतीत ते गंभीरपणे विचार करीत आहे. मुंबई-पुणे 149 किलोमीटरचा प्रवास विमानापेक्षाही वेगाने झाला तर? सध्या विमान प्रवासाला 45 मिनिटे लागतात. तोच ट्रेनने 25 मिनिटांत झाला तर? आश्‍चर्य वाटेल; पण हे शक्‍य झाले आहे ते हायपरलूप ट्रेनमुळे. विमानापेक्षा दुप्पट आणि बुलेट ट्रेनपेक्षा तिप्पट वेगाने धावणारी हायपरलूप ट्रेन म्हणजे वाहतुकीच्या जगात मोठी क्रांती ठरणार आहे. हायपरलूप ट्रेनचा वेग ताशी 1230 किलोमीटर आहे. जगभरातील अनेक देश हे तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या तयारीत आहेत.

अमेरिकेतील टेस्टला मोटर्स ऍन्ड स्पेस एक्‍सचे संस्थापक ऍलन मस्क यांनी 2013 मध्ये हायपरलूप ट्रेनची ब्ल्यू प्रिंट तयार केली. त्यानंतर हे संशोधन खुले केल्यानंतर जगभरातील अनेक संशोधकांनी सुधारणा करीत हे मॉडेल विकसित करून यशस्वी केले. या ट्रेनच्या वेगवान गतीचे तंत्रज्ञान समजावून घ्यावे लागेल. मोठी लंबगोलाकार नळी आणि त्यामधून धावणारी वेगवान कॅप्सूल, असे या ट्रेनचे दोन मुख्य भाग आहेत. पाण्याची मोठी पाइपलाइन जशी टाकली जाते, त्याप्रमाणे ही लंबगोलाकार नळीच्या बंदीस्त मार्गातून ही ट्रेन धावते. अंशत: निर्वात केलेल्या मोठ्या लंबगोलाकार नळीमध्ये कॅप्सूल असते. या कॅप्सूलमध्येच बैठक व्यवस्था केलेली असते. समजण्यासाठी कॅप्सूलला रेल्वेचा डबा असे संबोधू. नळीमधील कमी दाबाच्या वातावरणामुळे कॅप्सूल नळीत तरंगते. नळीच्या आत पृष्ठभागावर असलेल्या इलेक्‍ट्रोमॅग्नेटस्‌मुळे कॅप्सूलला वेगाने पुढे ढकलण्याची क्रिया केली जाते. नळीला कुठेही स्पर्श न करता घर्षणविरहित कॅप्सूल अलगदपणे पुढेपुढे वेगाने धावते. स्वयंचलित कार, रेल्वे, बुलेट ट्रेन, विमान याचा पुढचा टप्पा म्हणजे हायपरलूप ट्रेन असणार आहे. सौरऊर्जा, गतिजन्य ऊर्जा आणि पवन ऊर्जेवर ही ट्रेन कार्यान्वित होणार असल्याने इको फ्रेंडली असेल. अवघ्या पंचवीस मिनिटांत दीडशे किलोमीटरवरील दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा दुवा ठरेल.

प्रवासी नेण्याची याची क्षमता प्रतिवर्षी दीड कोटी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यानेच मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर येतात. जग वेगाने धावते आहे. जपान, चीन, इटली, स्पेन यांसारख्या देशांमध्ये वेगाने धावणाऱ्या ट्रेन आहेत. त्यांचा वेग ताशी 550 किलोमीटरपासून 360 किलोमीटर आहे. याउलट भारतीय रेल्वेचा वेग ताशी किमान 110 व कमाल 150 किलोमीटर आहे. रेल्वेचे विस्तीर्ण जाळे पाहता असे तंत्रज्ञान आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्‍यकता आहे. यासाठी गुंतवणुकीचे मार्ग शोधावे लागतील. भारतीय रेल्वे फार मोठ्या समस्या घेऊन धावत आहे. जुने पूल, लोहमार्गाची न होणारी दुरुस्ती, स्वातंत्र्यपूर्व काळातील जुनाट संदेशवहन यंत्रणा, कालबाह्य सुरक्षा व्यवस्था यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. हायपरलूप ट्रान्स्पोटेशन टेक्‍नॉलॉजीस (HTT) या अमेरिकन कंपनीने मुंबई-पुणे एक्‍स्प्रेसच्या बाजूने हायपरलूपचा ट्रॅक बसविण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. वाहतूक मंत्री नितीन गडकरी याला हिरवा कंदील दाखवतात का, याकडे लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com