माझे एन्काउंटर करण्याचे षड्यंत्र: प्रवीण तोगडिया

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जानेवारी 2018

जुने खटले काढून अटक करण्याचा डाव आहे. राजस्थान पोलिस मकर संक्रांतीदिवशी मला अटक करण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट काढून आले होते. एक जणाने मला घरात येऊन सांगितले की तुमचे एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र आहे. मी मृत्यूला घाबरत नसल्याचे सांगून मी सुरक्षा रक्षकांना सांगून तेथून निघाले आणि रिक्षात बसलो. राजस्थानमधील वकिलांशी संपर्क करून मी अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याचा प्रयत्न केला. जयपूर येथे जाऊन कार्यकर्त्यांसह न्यायालयात जाण्याचे मी नियोजन केले होते. पण, मला रिक्षात त्रास होऊ लागला.

अहमदाबाद - केंद्रीय गुप्तचर विभागाकडून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पोलिसांनी माझे एन्काऊंटर रचण्याचे षडयंत्र रचले असून, जुने खटले काढून मला अडकविण्यात येत आहे. मला घाबरविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप करताना विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना रडू कोसळले.

प्रवीण तोगडिया यांना सोमवारी रात्री अहमदाबाद येथे बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. त्यांच्यावर सध्या येथील चंद्रमणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होते. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. अखेर आज (मंगळवार) सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याबाबत घडलेल्या घडामोडींची माहिती दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

तोगडिया म्हणाले, हिंदूंसाठी मी आतापर्यंत लढत आलो आहे. यामध्ये राम मंदिर बनवा, गोहत्या बंदी, शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव द्या अशा मुद्द्यांचा समावेश होता. हिंदू संघटनांच्या एकतेसाठी मी काम करत राहिलो. पण, आता केंद्रीय गुप्तचर विभागाकडून माझा आवाज दाबण्याचा प्रय़त्न केला जात आहे. आयबीने माझा आवाज आणि मी तयार केलेल्या डॉक्टरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधात कायदा मोडण्याचे खटले दाखल करण्यात आला. जुने खटले काढून अटक करण्याचा डाव आहे. राजस्थान पोलिस मकर संक्रांतीदिवशी मला अटक करण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट काढून आले होते. एक जणाने मला घरात येऊन सांगितले की तुमचे एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र आहे. मी मृत्यूला घाबरत नसल्याचे सांगून मी सुरक्षा रक्षकांना सांगून तेथून निघाले आणि रिक्षात बसलो. राजस्थानमधील वकिलांशी संपर्क करून मी अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याचा प्रयत्न केला. जयपूर येथे जाऊन कार्यकर्त्यांसह न्यायालयात जाण्याचे मी नियोजन केले होते. पण, मला रिक्षात त्रास होऊ लागला. त्यानंतर मी रुग्णालयात होतो. माझे पोलिसांशी कोणतेही वैर नाही. 

Web Title: I am being threatened via IB says Pravin Togadia