'मी भाजपचेच काम करतोय'

'मी भाजपचेच काम करतोय'

पणजी- माझी समजूत कोणीतरी काढणार आहे हे मी वर्तमानपत्रात वाचले. आज चार दिवस झाले तरी कोणी आले नाही की कोणी साधा संपर्कही साधला नाही अशा शब्दात आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहे हे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार दयानंद सोपटे यांनी तीन दिवसात त्यांचे व पार्सेकर यांचे मतभेद मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्तक्षेपाने दूर होतील असे सांगितले होते.

त्याबाबत पार्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी येतो असे सांगितले होते. ते म्हणे मला भेटायला आले आणि मी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्याने त्यांना मला भेटता आले नव्हते. माझी आधी वेळ घेऊन मला ते भेटायला येणार हे मी वर्तमानपत्रातच वाचले. कदाचित त्यांना पणजी ते मांद्रे प्रवासासाठी वेळ मिळाली नसावी. ते काय किंवा अन्य कोण आले तरी त्यांचे स्वागतच आहे. मी पक्षातच आहे व पक्षाचेच काम करत आहे. त्यामुळे माझ्याकडे येण्याचा कोणास संकोच नको. मात्र तसे करताना माझ्या प्रश्‍नांची उत्तरेही मात्र त्यांनी तयार ठेवली पाहिजेत.

ते पुढे म्हणाले की, चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मध्यस्थी करणार असे मी वाचले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना विश्रांतीची सक्त गरज आहे. असे असताना त्यांना राजकीय कामे सांगणे कितपत योग्य हे ज्याचे त्याने समजले पाहिजे. मागच्या खेपेला मी भेटलो नाही असे आता होऊ नये गेले तीन दिवस मी घरीच थांबलो होतो. न भेटायला कोणी आले नाही की कोणी साधा संपर्कही केला नाही. यावरून मी उपस्थित केलेल्या मुद्यांची उत्तरे त्यांच्याकडे नसावीत असे दिसते.

भाजपचेच काम मांद्रे मतदारसंघात कायम ठेवले आहे. सर्व कार्यकर्ते सोबत आहेत, किंबहूना कॉंग्रेसचा राजीनामा आमदाराने दिल्याने त्यांच्यावर चिडलेले अनेकजण सोबत आले आहेत असे सांगून ते म्हणाले, मांद्रेतील स्वाभीमानी जनता अन्याय कधी सहन करत नाही. त्यांनीच मला लढण्याची बळ आणि प्रेरणा दिली आहे. दिवसेंदिवस वाढता पाठींबा मिळत आहे. त्यामुळे विधानसभेच्या येत्या निवडणुकीत भाजपकडून मीच लढेन अशी मला खात्री आहे. जनतेचा कौल माझ्यासाठी सर्वोच्च आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com