'...तर काँग्रेसचे 25 आमदार संध्याकाळपर्यंत आपमध्ये येतील'; केजरीवालांचा छातीठोक दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

'...तर काँग्रेसचे 25 आमदार संध्याकाळपर्यंत आपमध्ये येतील'; केजरीवालांचा छातीठोक दावा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमृतसर: पंजाबमधील विधानसभेच्या निवडणुका यावेळी खास आणि वेगळ्या ठरणार आहेत. याचं कारण असं की, सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसमधील चित्र सध्या फारसं आलबेल नाहीये आणि दुसरीकडे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडली आहे. दुसरीकडे ज्वलंत आणि देशाच्या राजकारणावर परिणामकारक ठरलेल्या कृषी कायद्यांच्या मुद्यांवर भाजपने यु-टर्न घेतला आहे. त्यामुळे अकाली दल आणि भाजपचं सुत पुन्हा जुळतंय का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये शिरकाव करु पाहणारा आम आदमी पक्ष सध्या ऍक्टीव्ह मोडवर आहे. जनतेच्या मनात असलेली काँग्रेसची जागा हेरून आपली जागा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आप आहे. या पार्श्वभूमीवरच अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Punjab CM Channi) आणि काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा: 'पवार आणि फडणवीसांचं लग्न झालं अन्'... ओवैसींचा संताप

केजरीवाल यांनी म्हटलंय की, काँग्रेसमधील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. मात्र, आम्हाला त्यांच्यातील कचरा आमच्यात नको आहे. जर आम्ही त्यांच्यातील लोकांना आमच्यात घ्यायला सुरुवात केली तर तर मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की, पंजाबमधील काँग्रेसचे 25 आमदार संध्याकाळपर्यंत आमच्या पक्षात येतील. त्यांचे 25 आमदार आणि 2-3 खासदार आमच्या संपर्कात आहेत आणि ते आमच्या पक्षात येऊ इच्छित आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पंजाबमधील अमृतसरमध्ये हे वक्तव्य केलं आहे.

बनावट केजरीवाल

चन्नी हे 'बनावट केजरीवाल' आहेत, असं केजरीवाल म्हणाले होते. त्यानंतर आता चन्नी यांनी या वक्तव्यावर पलटवार केला आहे. ''केजरीवाल आज कोणते मिशन पंजाबमध्ये सुरू करत आहेत? पंजाब अनाथ आहे का? पंजाबची काळजी घेण्यासाठी पंजाबी येथे आहेत. काही बाहेरचे लोक दिल्लीतून येऊन पंजाबवर राज्य कसे करू शकतात? ते इथे फक्त पंजाबींना फसवण्यासाठी आला आहे” असं चन्नी म्हणाले.

हेही वाचा: सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल

काय म्हणाले होते केजरीवाल?

केजरीवाल यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांच्यावर टीका करताना त्यांना 'खोटा केजरीवाल' असं म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की, सध्या एक खोटा केजरीवाल देखील फिरत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री माझीच आश्वासने आहे तशी कॉपी करत असल्याचा दावा त्यांनी करत त्यांना खोटा केजरीवाल अशी उपाधी दिली आहे. टीका करताना केजरीवाल यांनी म्हटलंय की, एक खोटा केजरीवाल सध्या फिरत आहे. जी काही आश्वासने मी पंजाबमध्ये देतो आहे, तीच आश्वासने हा खोटा केजरीवाल दोन दिवसांनी देतो आहे. तो काम करत नाही, कारण तो खोटा आहे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यात महिलांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

loading image
go to top