..म्हणून त्या माणसाला मी जीपसमोर बांधले : मेजर गोगोई

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

दगडफेक सुरू असताना मी एका माणसाला आमच्या गाडीजवळ पाहिले. दगडफेक करणाऱ्या जमावामध्येच तो उभा होता आणि त्यांना चिथावणी देत होता. त्याला पकडून आणण्याचे आदेश मी माझ्या सहकाऱ्यांना दिले. आम्हाला पाहताच तो जमावाच्या दिशेने पळून जाऊ लागला. तो त्याच्या बाईकवर बसण्याचा प्रयत्न करत होता; पण आम्ही त्याला पकडले. 
- मेजर लितूल गोगोई

नवी दिल्ली : दगडफेक करणाऱ्या जमावापासून बचाव करण्यासाठी चक्क एका माणसालाच जीपच्या पुढे बांधणाऱ्या मेजर लितूल गोगोई यांनी आज (मंगळवार) त्यांच्या या कृतीमागील हेतू जाहीर केला. 'मी त्या वेळी तसे केले नसते, तर किमान 12 जणांचे जीव गेले असते', असे स्पष्टीकरण देत मेजर गोगोई यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. 

जम्मू-काश्‍मीरमध्ये पोटनिवडणुका सुरू असताना गेल्या महिन्यात दगडफेकीच्या घटनाही वाढल्या होत्या. निवडणुकीच्या कामावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी मेजर गोगोई यांच्या गटाकडे होती. बडगाममधील मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था तपासण्याचे आदेश मेजर गोगोई यांना देण्यात आले. जवळपास एक हजार जणांनी दगडफेक करत त्या मतदान केंद्राला घेरले होते. मतदान केंद्रावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न हा जमाव करत होता. प्रयत्नांची शिकस्त करून मेजर गोगोई यांच्या गटाने निवडणूक कर्मचाऱ्यांना सुखरूप मतदान केंद्राबाहेर काढले. पण तेथून जाण्यास अवघड झाले होते. 

काय झाले होते त्या दिवशी?

मेजर गोगोई म्हणाले, 'मी सतत सांगत होतो, की आम्ही फक्त या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी आलो आहोत. पण त्या जमावाने ऐकले नाही. त्या जमावातील एक जण इतरांना भडकावत होता. माझ्या सहकाऱ्यांनी गोळीबार करण्याची परवानगी मागितली. पण मी तसे करण्यास नकार दिला. अचानक माझ्या मनात कल्पना आली. त्या माणसालाच आम्ही पकडले आणि जीपला बांधले. त्याला जीपला बांधलेले पाहिल्यानंतर दगडफेक बंद झाली. यामुळे त्या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी आम्हाला संधी मिळाली. स्थानिक नागरिकांना वाचविण्यासाठीच मी हे पाऊल उचलले. असे केले नसते, तर गोळीबार करावा लागला असता आणि किमान 12 जणांचे प्राण गेले असते.'' 

Web Title: I tied stone-pelter to jeep so that I can save many lives; says Majro Leetul Gogoi