पक्षाची यापुढे शिस्त पाळणार: साध्वी प्रज्ञा

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जून 2019

मी, पक्षाची शिस्तबद्ध सदस्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनेत शिस्त असायलाच हवी. मी त्या शिस्तीचे पूर्णपणे पालन करेन.

भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त ठरवल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांना भाजपने कारणेदाखवा नोटीस बजावली होती.

भोपाळ मतदारसंघातील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना त्यांच्या वादग्रस्त विधानांची अखेर उपरती झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी सातत्याने वादग्रस्त विधाने करुन पक्षाला अडचणीत आणले होते. परंतु साध्वी प्रज्ञा यांनी आता आपण पक्षशिस्तीचे पालन करणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त ठरवल्यानंतर पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवाय, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपण साध्वी यांना माफ करणार नसल्याचे म्हटले होते. पक्षाने त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावली होती.

या नोटीसला उत्तर देताना त्यांन म्हटले आहे की, 'मी, पक्षाची शिस्तबद्ध सदस्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनेत शिस्त असायलाच हवी. मी त्या शिस्तीचे पूर्णपणे पालन करेन. त्यामुळे मला संधी मिळेल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आवडेल.'

दरम्यान, भोपाळमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी प्रथम दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले हेमंत करकरे यांचा आपल्या शापामुळेच मृत्यू झाला असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या विधानावर चौफेर टीका झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: i will follow discipline of Party says sadhvi pragya singh thakur