700 सहकाऱ्यांसोबत पाकशी लढू द्या; दरोडेखोराची सरकारकडे मागणी

वृत्तसंस्था
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात लाट आली असून अनेकांनी पाकिस्तानला उत्तर देण्याचा इच्छा बोलून दाखवली आहे. त्यात आता चंबळ खोऱ्यातील कुख्यात माजी दरोडेखोर मल्खन सिंह याने देखील आपण पाकिस्तानसोबत लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

कानपूर- पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात लाट आली असून अनेकांनी पाकिस्तानला उत्तर देण्याचा इच्छा बोलून दाखवली आहे. त्यात आता चंबळ खोऱ्यातील कुख्यात माजी दरोडेखोर मल्खन सिंह याने देखील आपण पाकिस्तानसोबत लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. यासाठी सरकारने आपल्याला परवानगी द्यावी असेही त्याने म्हटले आहे. 700 सहकाऱ्यांसह आपण सीमेवर जाऊन लढायला तयार असल्याचे त्यांने सांगितले आहे.

मल्खन सिंह म्हणाला कि, आम्ही दुधखुळे नाही, 15 वर्षे लुटूपुटूचा खेळ खेळलेलो नाही. आई भवानीची कृपा राहिली तर मल्खन सिंहच्या केसालाही धक्का लागणार नाही. आमची इच्छा आहे की आम्हाला सीमेवर पाठवण्यात यावे. मध्य प्रदेशात 700 दरोडेखोर शिल्लक आहेत. त्यांना सोबत घेऊन आपण सीमेवर जाऊन मरण्यास तयार आहोत. जर सरकारने आम्हाला परवानगी दिली तर विनाशर्त, विनावेतन देशासाठी आम्ही सीमेवर जाऊन मरण्यासही तयार आहोत. उरलेले जीवन आम्ही देशासाठी अर्पण करण्यास आम्ही तयार आहोत, जर आम्ही माघार घेतली तर नाव लावणार नाही. तसेच, जर आगामी निवडणुकांमध्ये मला लोकसभेचे तिकीट मिळाले तर निवडणुकीच्या रिंगणातही आपण उतरायला तयार असल्याचे त्याने सांगितले आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी कानपूरमध्ये आला असता मल्खन सिंह असे बोलला आहे. निवडणूका आहेत आणि होतच राहतील, मात्र आपल्याला या हल्ल्याचा बदला घ्यायलाच हवा. जर काश्मीरवर निर्णय घेण्यात आला नाही तर कोणाचाही राजकारणावर विश्वास राहणार नाही, असेही मल्खन सिंहने स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Will Fought To Pak With 700 Dacoits Says Dacoit Malkhan Singh