दिल्लीत हवाई दलाच्या अधिकाऱ्याला मारहाण

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

हवाई दलाच्या अधिकाऱ्याला होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.

नवी दिल्ली - दिल्लीतील संगम विहार भागात आज (रविवार) सकाळी हवाई दलाच्या अधिकारी चालवत असलेल्या दुचाकीने मोटारीला स्पर्श केल्याने हवाई दलाच्या अधिकाऱ्यास बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचा गणवेशही फाडण्यात आला.

काश्मीरमधील सीआरपीएफ जवानांना झालेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच आता हवाई दलाच्या अधिकाऱ्यालाही मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाचे अधिकारी सुजॉय कुमार सिकंदर हे महरौली-बदरपूर रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना यांच्या दुचाकीने स्विफ्ट कारला मागून स्पर्श केला. या कारणावरून मोटारीतील दोघांनी सुजॉय कुमार यांना गाठत भररस्त्यात बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी त्याठिकाणी अन्य एका कारमधून आलेल्या व्यक्तीनेही त्यांना मारहाण केली. त्यांचा गणवेश फाडण्यात आला आणि त्यांच्याकडून आयकार्ड हिसकावून घेण्यात आले.

हवाई दलाच्या अधिकाऱ्याला होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांनी लुटलेल्या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: IAF officer assaulted in Delhi's Sangam Vihar