esakal | आता, या व्यवस्थेत जीव रमत नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

आता, या व्यवस्थेत जीव रमत नाही!

कन्नन यांनी त्यांच्या सेवाकाळामध्ये ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जासारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळली होती. 

आता, या व्यवस्थेत जीव रमत नाही!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ज्यांना आवाज नाही, त्यांचा आवाज होता यावा, म्हणून मी सनदी सेवेत प्रवेश केला होता. पण, येथे मीच माझा आवाज गमावून बसलो असल्याने आता या व्यवस्थेत माझा जीव रमत नाही, अशी खंत व्यक्त करीत आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी त्यांचा राजीनामा दादरा आणि नगर हवेली प्रशासनाकडे सादर केल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

कन्नन यांनी त्यांच्या सेवाकाळामध्ये ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जासारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळली होती. कन्नन गोपीनाथन हे सध्या ऊर्जा, नागरी विकास आणि कृषी विभागाचे सचिव होते. त्यांनी बुधवारी (ता. 21) गृह सचिवांना पत्र लिहिले असून, प्रशासकीय सेवेतून मुक्त होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. "मला माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे आहे. मी दुसऱ्यांचा आवाज बनू शकेल, या विश्‍वासाने मी प्रशासकीय सेवेत दाखल झालो. पण, इथे तर मी माझ्याच आवाजाचा वापर करू शकत नाही. राजीनाम्यानंतर मला माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पुन्हा मिळू शकेल,'' अशी भावना गोपीनाथन यांनी व्यक्त केली. "माझ्या या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही, हे मला माहीत आहे. याची काही काळ केवळ "बातमी' होईल. मात्र, याची किंमतही खूप मोठी आहे. माझ्या सदसद्विवेकबुद्धीनुसार मला पाऊल उचलायचे आहे,'' असेही त्यांनी सांगितले. 

आपली मते खुलेपणाने व्यक्त करता न येणे, काश्‍मीरमधील नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणे आणि ही घटना कोणत्या दुसऱ्या देशात घडल्याप्रमाणे देशवासीयांचे त्याकडे निष्क्रियपणे पाहणे, यामुळे व्यथित झाल्याने कन्नन गोपीनाथन राजीनामा देण्याच्या निर्णयाप्रत पोचल्याचे सूत्रांनी सांगितले. 

"नागरी सेवेबद्दल अपेक्षा होती' 
राजीनाम्याच्या कारणाबद्दल त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटही केले आहे. "नागरी सेवा म्हणजे बरोबर असलेल्या नागरिकांसाठी अधिकारांचा वापर आणि स्वातंत्र्याची संधी, असे मला वाटत होते, असे ट्विट त्यांनी सुरवातीला केले.

त्यानंतरच्या ट्‌विटमध्ये त्यांनी हॉंगकॉंगच्या अर्थव्यस्थेविषयी भाष्य करणारी लिंक शेअर करीत स्वातंत्र्य आणि लोकशाहीशिवाय त्यांच्या संपत्तीला काही अर्थ नाही, हे हॉंगकॉंगने जाणले आहे, असे सांगत त्याचा संबंध देशातील स्थितीशी जोडला आहे.

loading image
go to top