"आयएसआय' अधिकाऱ्याचा लखनौत मृतदेह आढळला

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

लखनौमधील हजरतगंज भागातील मीराबाई गेस्ट हाउसजवळ त्यांचा मृतदेह आढळला. या गेस्ट हाउसमध्ये ते दोन दिवसांपासून राहत होते. रस्त्यावर एक मृतदेह पडल्याचे नागरिकांनी पोलिसांना कळविले. त्यांच्याजवळील ओळखपत्रावरून त्यांचे नाव समजले

लखनौ - भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी अनुराग तिवारी यांचा मृतदेह शहरातील रस्त्याकडेला बुधवारी आढळला. त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे तिवारी यांचा आज वाढदिवस होता. बहाराईच येथील त्यांच्या घरी त्यानिमित्त पूजेची तयारी सुरू असतानाच सकाळी आठ वाजता तिवारी यांच्या मृत्यूचे वृत्त दूरध्वनीवरून मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला.

लखनौमधील हजरतगंज भागातील मीराबाई गेस्ट हाउसजवळ त्यांचा मृतदेह आढळला. या गेस्ट हाउसमध्ये ते दोन दिवसांपासून राहत होते. रस्त्यावर एक मृतदेह पडल्याचे नागरिकांनी पोलिसांना कळविले. त्यांच्याजवळील ओळखपत्रावरून त्यांचे नाव समजले. तिवारी यांच्या हनुवटीला जखम झाल्याचे दिसले तरी शरीरावर अन्य ठिकाणी कोणतीही जखम नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.

तिवारी यांचा नुकताच घटस्फोट झाला होता. त्यामुळे ते निराश होते. तिवारी हे 2007 च्या तुकडीतील कर्नाटक केडरचे "आयएसआय' अधिकारी होते. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण विभागाच्या आयुक्तपदी बंगळूरमध्ये त्यांची नियुक्ती जानेवारीत झाली होती. अभियंता असलेल्या तिवारी यांची नियुक्ती गेल्या वर्षी कर्नाटकमधील बिदर येथे झाली असताना त्यांनी तेथील पाणीटंचाईच्या समस्येवर यशस्वी तोडगा काढला होता.
 

Web Title: IAS oficer found dead in Lucknow