Viral Video:आयएएस ऑफिसर सोशल मीडियावर व्हायरल; कारण आहे गाणं

टीम ई-सकाळ
Wednesday, 21 October 2020

महिलांना काम करण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, विशेषतः त्यांना प्रशासकीय सेवेत आणण्याासाठी राखी गुप्ता यांनी प्रयत्न केले आहेत.

नवी दिल्ली : पंजाबमधील राखी गुप्ता या आयएएस ऑफिसर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. चर्चेच कारण, गाणं आहे. हो गाणंच. राखी गुप्ता यांनी एक भजन गायलं असून, ते त्यांनी यू-ट्यूबवर शेअर केलं. राखी गुप्ता यांच्या या सुरील्या आवाजाचं सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना राखी यांनी ही 'जस्ट हॉबी' अशी प्रतिक्रिया दिलीय. 

आणखी वाचा - प्रतापगडावर भवानी मातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण

प्रशासकीय कामात पाडली छाप
राखी गुप्ता 1997च्या बॅचच्या आयएएस ऑफिसर आहेत. त्यांनी 2015-16 याकाळात केंद्रीय गृहमंत्रालयात सेवा दिली आहे. श्रीराम कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांचे शिक्षण झाले. नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये त्यांनी फिलॉसॉफी विषयात मास्टर डिग्री घेतली आहे. प्रशासनात काम करताना, त्यांनी कर्तृत्वाची वेगळी छाप पाडली आहे. महिलांना काम करण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, विशेषतः त्यांना प्रशासकीय सेवेत आणण्याासाठी राखी गुप्ता यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांची दखलही घेण्यात आली आहे. केंद्रीय महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीने त्यांना स्त्री शक्ती पुरस्कार देऊन राखी गुप्ता यांच्या सन्मान करण्यात आलाय. 

आणखी वाचा - 'फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल असं वाटलं नव्हतं'

व्हिडिओला एक लाख व्हूज
राखी गुप्ता यांच्या 'मै तो रतनुंगी राधा नाम' या गाण्याला यू-ट्यूबवर प्रचंड प्रतिसाद मिळालाय. राधा-कृष्णाचे हे भजन सध्या सोशल मीडियावर प्रचंड शेअर होत आहे. गौरव देव आणि कार्तिक देव यांनी ते संगीतबद्ध केलं असून, त्याला राखी गुप्ता यांचा आवाज आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये राखी गुप्ता यांनी हे गाणं आपल्या आईला समर्पित करत असल्याचं म्हटलंय.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ias rakhee gupta radha krishna bhajan gets viral