आयसीआयसीआय बँकेला 119 कोटींचा तोटा 

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जुलै 2018

बॅंकेला गत वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत 2 हजार 49 कोटींचा नफा झाला होता. यंदा बॅंकेला 5 हजार 971.29 कोटींची तरतूद करावी लागली. गतवर्षाच्या तुलनेत तरतुदीसाठी 128.86 टक्‍क्‍यांची वाढ झाली.

मुंबई : व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जप्रकरणी चर्चेत आलेल्या आयसीआयसीआय बॅंकेला जूनला संपलेल्या पहिल्या तिमाहीत 119.55 कोटींचा तोटा झाला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या नव्या नियमांनुसार बुडीत कर्जांसाठी भरीव तरतूद करावी लागल्याने बॅंकेला तोटा झाला आहे. 

बॅंकेला गत वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत 2 हजार 49 कोटींचा नफा झाला होता. यंदा बॅंकेला 5 हजार 971.29 कोटींची तरतूद करावी लागली. गतवर्षाच्या तुलनेत तरतुदीसाठी 128.86 टक्‍क्‍यांची वाढ झाली. ज्यामुळे बॅंकेने 119.55 कोटींचा तोटा नोंदविला आहे. बॅंकेला निव्वळ व्याजातून 6 हजार 102 कोटींचे उत्पन्न मिळाले. ज्यामध्ये 9.16 टक्‍क्‍यांची वाढ झाली. 18 हजार 574 कोटींचे एकूण उत्पन्न मिळाले. जूनअखेर बुडीत कर्जांचे प्रमाण 8.81 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे.

बुडीत कर्जांचा वाढता डोंगर, कंपनी कायदा लवादाकडेल प्रलंबित दिवाळखोरीची प्रकरणे याचाही परिणाम झाला आहे. नुकताच बहुतांश बॅंका आणि वित्तसंस्थांनी बुडीत कर्जांवर तोडगा काढण्यासाठी परस्पर सहकार्य करार केला, मात्र आयसीआयसीआय बॅंकेने यात सहभाग घेतला नाही. 

Web Title: ICICI Bank gets 119 Crore loss