चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे निधन; मोदींनी वाहिली श्रद्धांजली

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचं वयाच्या 95 व्या वर्षी राहत्या घरी निधन झालं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. पद्मभूषण, दादासाहेब फाळके यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेलेल्या मृणाल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं.

मुंबई- सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचं वयाच्या 95 व्या वर्षी राहत्या घरी निधन झालं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. पद्मभूषण, दादासाहेब फाळके यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेलेल्या मृणाल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं.

मृणाल यांचा जन्म 14 मे 1923 रोजी फरीदपुरमध्ये झाला. हे शहर सध्या बांगलादेशमध्ये आहे. मृणाल यांनी बांगला भाषेतील चित्रपटांची सर्वाधिक निर्मिती केली. मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला चित्रपट मृगयाचं दिग्दर्शन ही त्यांनी केलं होतं. मृणाल सेन यांना आतापर्यंत 20 राष्ट्रीय आणि 12 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

अनेक दिग्गजांसोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मृणाल सेन यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. मृणाल यांनी 1955 मध्ये रातभोर या आपल्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. यानंतर त्यांनी 1960 मध्ये बाइशे श्रावण या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांचा हा चित्रपट चांगलाच गाजला.
 

आंतरराष्ट्रीय जगतात त्यांच्या चित्रपटांची दखल घेण्यात आली. ऐशींच्या दशकात सुरू झालेल्या समांतर चित्रपट चळवळीत मृणाल यांचं योगदान मोलाचं होतं. 2002 साली त्यांनी आमार भुवन या शेवटच्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.

Web Title: Iconic Filmmaker Mrinal Sen Dies At 95