हरियाणातील भाजप सरकार संकटात ? शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन उपमुख्यमंत्री चौटाला देऊ शकतात राजीनामा

manoharlal khattar.jpg
manoharlal khattar.jpg

नवी दिल्ली- हरियाणामधील भाजपचे खट्टर सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप सरकारचा सहकारी पक्ष जननायक जनता पार्टीने (जेजेपी) शेतकरी आंदोलनावरुन मोठे वक्तव्य केले आहे. जेजेपीचे नेते तथा उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीला (एमएसपी) कोणताही धक्का लावू देणार नसल्याचे म्हटले. जर शेतकऱ्यांच्या एमएसपीचे नुकसान झाले तर चौटाला राजीनामा देतील असे पक्षाने स्पष्ट केले आहे. जेजेपीने केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याची मागणी केली आहे. 

जेजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रतीक सोम यांनी 'आयएनएस' वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे चंदीगडमध्ये असताना एमएसपीवर कोणत्याही परिस्थितीत परिणाम होऊ देणार नाहीत. पण त्यानंतरही जर एमएसपीवरुन शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसले तर सर्वात आधी दुष्यंत चौटाला राजीनामा देतील. जेजेपी नेहमी शेतकऱ्यांबरोबर उभा राहणारा पक्ष आहे. 

हार्वर्ड लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण घेतलेले आणि व्यवसायाने सुप्रीम कोर्टातील वकील जेजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रतीक सोम म्हणाले की, चौधरी देवीलाल यांची विचारधारा असलेला जेजेपी शेतकऱ्यांसाठीचा पक्ष आहे. जेजेपीने केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी केली आहे. एमएसपीवर सरकारला ठोस आश्वासन मिळणे आवश्यक आहे. आशा आहे की, केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करुन हा मुद्दा सोडवेल. त्यामुळे अडथळेही दूर होतील. 

यापूर्वी जेजेपीचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार अजयसिंह चौटाला यांनी केंद्र सरकारला एमएसपी कायदा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मंगळवारी म्हटले होते की, शेतकऱ्यांच्या मागणीवर केंद्राने सर्वसंमतीने मार्ग काढला पाहिजे. आंदोलकांच्या अडचणी सरकारने त्वरीत दूर करायला हव्यात. एमएसपीचा कायद्यात समावेश करण्याबाबत केंद्राने विचार केला पाहिजे. 

दरम्यान, हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर सरकारला पाठिंबा देणाऱ्या जेजेपीचा मुख्य मतदार हा जाट आणि शेतकरी असल्याचे मानले जाते. शेतकरी आंदोलनावरुन जेजेपीवर मोठा दबाव आहे. पक्ष आपल्या मतदारांना नाराज करु इच्छित नाही. त्यामुळेच पक्षाच्या नेत्यांनी हरियाणात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येऊ दिली जाणार नसल्याचे पक्षांकडून सातत्याने सांगितले जात आहे असे, सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार समजते. 

हरियाणात मागीलवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुमत न मिळालेल्या भाजपला जेजेपीच्या 10 आमदारांच्या पाठिंब्यामुळे खट्टर सरकारची स्थापना करता आली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com