इफ्फी; युद्धज्वर आणि नात्यांचे हळवे पट

इफ्फी; युद्धज्वर आणि नात्यांचे हळवे पट

पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) दुसरा दिवस तुफान गर्दी, तिकिटे न मिळाल्याने प्रेक्षकांनी घातलेला गोंधळ, उन्हात ताटकळत राहावे लागल्याने संयोजकांवर निघालेला राग, यामुळे वादाच्या अनेक प्रसंगांचा ठरला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अर्जेंटिनाचा "द अनसीन', रशियाचा "वेन गॉग्ज' व "डोनबास' या चित्रपटांनी ठसा उमटवला. 

प्रेक्षकांच्या मोठ्या रांगा व गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील चित्रपटांची चर्चा रंगली. "वेन गॉग्ज' हा बाप व मुलातील प्रेम व संघर्षाची गोष्ट, अनोखे नाते व चमकदार संवादांमुळे रंगला. मार्क हा 52 वर्षांचा कलाकार प्रतिभावान आहे, मात्र वडिलांशी पटत नसल्याने तो तेल अवीवला जाऊन राहतो. मार्कचे वडील व्हिक्‍टर संगीतकार आहेत व मुलगा निघून गेल्यावर उतार वयातही ते कामात मग्न राहतात.

आईचे निधन व वडिलांना जीवघेणा आजार झाल्याचे समजल्यावर मार्क घरी परततो. आता दोघांमधील संघर्ष प्रेमात रूपांतरित होतो. वडील व मुलांमधील हे टोकाचे नाते दिग्दर्शकाने अत्यंत तरलतेने उभे केल्याने चित्रपट लक्षात राहिला. 
स्पर्धेतील रशियाचाच दुसरा चित्रपट "डोनबास'मध्ये यादवी युद्ध आणि त्याचा सर्वच यंत्रणांकडून उठविला जाणारा फायदा यांवर अत्यंत बोचरे भाष्य करण्यात आले. पूर्व युक्रेनमधील डोनबास या प्रांतामधील सरकार विरुद्ध विघटनवादी यांच्यातील संघर्षाची ही गोष्ट. राजकारणी, सरकारी अधिकारी, पोलिस, डॉक्‍टर, मीडिया या परिस्थितीचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा उपयोग करतात, यावर कथेत ब्लॅक ह्युमरच्या मदतीने जळजळीत भाष्य करण्यात आले आहे.

दिग्दर्शक सर्जेई लॉझनिट्‌झा यांनी एक प्रसंग व त्यातील एका पात्राचा संदर्भ घेत पुढच्या प्रसंगाकडे जात कथा छान गुंफली आहे. सरकार विरुद्ध विघटनवादी यांच्यात नक्की कोणाची बाजू बरोबर याचा जगभरात असलेला पारंपरिक संभ्रम मांडत चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. 

पाण्याचा प्रश्‍न आणि युद्ध 

अर्जेंटिनाच्या "द अनसीन' या चित्रपटामध्ये पाण्याच्या दुर्भिक्षामुळे स्थलांतर कराव्या लागणाऱ्या व त्यामुळे त्यांना देशातील युद्धजन्य भागात अडकलेल्या जोडप्याची कथा मांडण्यात आली. इथेही युद्धाच्या नावाखाली सामान्य नागरिकांना वेठीस धरून आपला फायदा करून घेणारी यंत्रणा आहेच. हे जोडपे अशाच संकटात सापडते, मात्र वर्तमानपत्राचा एक छायाचित्रकार त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतो.

युद्धभूमीतून वाट काढत बाहेर पडण्याचा या तिघांचा हा प्रवास अंगावर रोमांच उभे करणारा ठरला. वर्ल्ड प्रीमिअर या प्रकारातील अमेरिकेचा "मेन' हा मॅथ्यू ब्राउन दिग्दर्शित चित्रपट एकट्याने हाइकिंगसाठी निघालेल्या एका विवाहित तरुणीची गोष्ट सांगतो. प्रवासात ओळख झालेल्या आणखी एका हायकरला भेटल्यावर तिचे जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान पूर्णपणे बदलते. कथा लांबलचक व खूपच संवादी असल्याने हा प्रवास फारसा रंगला नाही. 

इंडियन पॅनोरमामधील बंगाली चित्रपट "उमा'नेही एक हळवापट उभा केला. स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झालेले वडील आपल्या कॅन्सरग्रस्त मुलीच्या इच्छेखातर एप्रिल महिन्यात कोलकत्यात दुर्गापूजेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतात. त्यासाठी एका चित्रपट दिग्दर्शकाची मदत घेतली जाते. त्याची टीम हा माहोल उभा करून मुलीची इच्छा पूर्ण करताना त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अभिनयाबरोबरच संगीत व छायाचित्रणाच्या आघाडीवरही हा चित्रपट उजवा ठरला. 

संयोजनाचा अभाव 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संयोजनामध्ये झालेल्या गफलतीमुळे प्रेक्षकांना मोठ्या रांगा व प्रेक्षागृहात प्रवेश न मिळण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील चित्रपटांना मोठी गर्दी होत असल्याने ते गोवा कला अकादमीच्या मोठ्या प्रेक्षागृहात आयोजित केले जातात.

यंदा मात्र हे चित्रपट कमी आसनसंख्या असलेल्या "आयनॉक्‍स'मध्ये ठेवल्याने गोंधळ उडाला. जवळपास प्रत्येक शोसाठी मोठ्याच मोठ्या रांगा लागल्या व अनेकांना ताटकळत उभे राहूनही प्रवेश मिळू शकला नाही. याचा राग प्रेक्षकांनी संयोजकांवर काढल्याने वादाचे प्रसंग उभे राहिले. महोत्सवाच्या उत्तरार्धात हे चित्रपट पुन्हा दाखवू, असे सांगत संयोजकांनी वेळ मारून नेली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com