आयआयटी कानपूरच्या पोर्टलवर पवित्र हिंदु धर्मग्रंथ...

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

आयआयटी आणि इतर क्षेत्रांतील विद्वानांनी हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी बरेच काम केले आहे. अशा प्रकारचा हा भारत व एकंदरच जगातील पहिलाच प्रकल्प आहे आणि त्याचा आदर केला जावा, अशी अपेक्षा आहे. अशा चांगल्या कामावर टीका होईलच. अर्थातच अशा चांगल्या, पवित्र कामामुळे संस्थेच्या धर्मनिरपेक्ष धोरणबद्दल प्रश्‍न उपस्थित करण्यात येऊ नये

लखनौ - श्रीमद भगवतगीता, रामचरित मानस, ब्रह्मसुत्रे, योगसुत्रे, श्री राम मंगल दासजी, उपनिषदे अशा हिंदु धर्मामधील पवित्र मानल्या जाणाऱ्या ग्रंथांची माहिती ध्वनिमुद्रित आणि लिखित स्वरुपात देणारी "सेवा' देण्यास कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) प्रारंभ केला आहे.

या सेवेंतर्गत या पवित्र धर्मग्रंथांमधील श्‍लोकांच्या उच्चारांसहित श्री शंकराचार्य, स्वामी विवेकानंद अशा विविध धर्मपंडितांनी या धर्मग्रंथांवर केलेले भाष्यही या संकेतस्थळावर (https://www.gitasupersite.iitk.ac.in/) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या धर्मग्रंथांमध्ये वाल्मिकी रामायणाचाही अर्थातच समावेश करण्यात आला आहे.

""आयआयटी आणि इतर क्षेत्रांतील विद्वानांनी हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी बरेच काम केले आहे. अशा प्रकारचा हा भारत व एकंदरच जगातील पहिलाच प्रकल्प आहे आणि त्याचा आदर केला जावा, अशी अपेक्षा आहे. अशा चांगल्या कामावर टीका होईलच. अर्थातच अशा चांगल्या, पवित्र कामामुळे संस्थेच्या धर्मनिरपेक्ष धोरणबद्दल प्रश्‍न उपस्थित करण्यात येऊ नये,'' असे येथील ज्येष्ठ प्राध्यापक टी व्ही प्रभाकर यांनी सांगितले. या नवीन मोहिमेमुळे हिंदु धर्म लादण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला.

या नव्या मोहिमेंतर्गत लवकरच आणखी ग्रंथांचाही समावेश करण्यात येणार आहे. यासाठी या संस्थेस केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

Web Title: IIT KanpurHindu sacred texts Srimad Bhagwadgita