esakal | धक्कादायक! 15 मेपर्यंत ऍक्टीव्ह रुग्णसंख्या जाणार 30 ते 35 लाखांवर; IIT च्या संशोधकांचा दावा

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! 15 मेपर्यंत ऍक्टीव्ह रुग्णसंख्या जाणार 30 ते 35 लाखांवर; IIT च्या संशोधकांचा दावा

धक्कादायक! 15 मेपर्यंत ऍक्टीव्ह रुग्णसंख्या जाणार 30 ते 35 लाखांवर; IIT च्या संशोधकांचा दावा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या ही भीतीदायक बनत चालली आहे. कोरोनाची दुसरी लाट किती जणांना आपल्या विळख्यात ओढणार आणि किती लोक यामध्ये आपला प्राण गमावणार याबाबत सध्या चिंतेचा सूर आहे. हे सारं कधी थांबणार, असा हतबल सवाल देखील लोकांकडून विचारला जातोय. दररोज सुमारे साडेतीन लाख रुग्ण देशात आढळत असून आता ही रुग्णसंख्या अशीच कुठवर वाढत जाईल, याचा एक अभ्यास समोर आला आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान अर्थात आयआयटीच्या संशोधकांनी आपल्या गणितीय मॉडेलच्या आधारावर असा अंदाज बांधला आहे की, भारतात कोरोना व्हायरसच्या महामारीची दुसरी लाट 11 ते 15 मेच्या दरम्यान टिपेला पोहोचलेली असेल. तसेच त्यावेळी देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ही 33 ते 35 लाखांवर पोहोचलेली असू शकते. त्यानंतर मे अखेरपर्यंत या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा तितक्याच गतीने घट होईल. भारतात आज शुक्रवारी एका दिवसातील संक्रमणामध्ये 3,32,730 (3.32 लाख) नवे रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 2263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून 24,28,616 झाली आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी घेतला आक्षेप; केजरीवालांनी मागितली माफी

आयआयटी कानपूर आणि हैद्राबादच्या संशोधकांनी 'ससेक्टीबल, अनडिटेक्ड, टेस्ट्ड (पॉझिटीव्ह) एँड रिमूव्ह अप्रोच (सूत्र)' (Susceptible, Undetected, Tested (positive), and RemovedApproach (SUTRA) मॉडेलच्या आधारावर असा अनुमान लावला आहे की, या रुग्णसंख्येमध्ये घट येण्याआधी मेच्या मध्यावधीमध्ये उपचाराधीन रुग्णांच्या संख्येमध्ये 10 लाखांपर्यंत वाढ होऊ शकते. संशोधकांचं म्हणणं आहे की, दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगाणामधील नव्या रुग्णांची संख्या 25 ते 30 एप्रिल दरम्यान नवी उंची गाठू शकतात. तर महाराष्ट्र आणि छत्तीसगढ याआधीच नव्या रुग्णसंख्येमध्ये टीपेला पोहोचला आहे. आयआयटी कानपूरच्या कंम्प्यूटर सायन्स विभागातील प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी सांगितलं की, 11 ते 15 मेच्या दरम्यान उपचाराधीन रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्यास तार्किक कारण आहे आणि ती वाढ 33 ते 35 लाख होऊ शकते. ही तीव्र गतीने होणारी वाढ आहे मात्र तेवढ्याच तीव्र गतीने नव्या प्रकरणांमध्ये घट होण्याची देखील शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरिस यामध्ये नाटकीय पद्धतीने घट होईल.