पणजीत इंटरनॅशनल ब्लॉकचेन परिषदेचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

गोवा माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे पणजीतील आयनॉक्‍समध्ये आयोजित एकदिवशीय इंटरनॅशनल ब्लॉकचेन काँग्रेस परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या परिषदेचे उद्‌घाटन झाले.

पणजी : आजच्या युगातील नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाबाबत अनेक अपेक्षा असल्याने 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञान हे सुप्रशासनासाठी आवश्‍यक आहे व ते महत्वाचे साधन बनू शकते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहितीची अदलाबदल करणे शक्‍य होणार आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा कोणतीही माहिती उपलब्ध होण्यास होणार असल्याचे मत माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले. 

गोवा माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे पणजीतील आयनॉक्‍समध्ये आयोजित एकदिवशीय इंटरनॅशनल ब्लॉकचेन काँग्रेस परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या परिषदेचे उद्‌घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू अरुण साहनी, हेमंत दरबारी, माहिती तंत्रज्ञान सचिव अमेय अभ्यंकर, आयबीएमचे फ्रान्स केम्पेन, शेखर मित्तल, जीसीसीआय अध्यक्ष संदीप भांडारे, न्यूक्‍लियस व्हिजनचे अभिषेक पिट्टी, इलेव्हन ओ-वनचे राना अय्यर हे उपस्थित होते. 

या उद्‌घाटनपर कार्यक्रमानंतर 'ब्लॉकचेन व प्रशासन' विषयावर या विषयावर चर्चा झाली. यावेळी मत मांडताना मंत्री खंवटे यांनी सांगितले की, ब्लॉकचेन या साधनाचा उपयोग जमिनींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या माध्यमातून भू दस्तऐवजाची माहिती सहज उपलब्ध होईल त्यामुळे फसवणूक होण्याचे प्रकार कमी होतील. त्यामुळेच ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे सुप्रशासनासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल व अचूक माहिती मिळवण्याचे ते मजबूत साधन ठरणार आहे. फ्रान्स कॅम्पेन म्हणाले, ब्लॉकचेन हे पारदर्शक व विश्‍वासू साधन ठरणार असून त्याचप्रकारेच त्याचे डिझाईन करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी होईल असे कुलगुरू अरुण साहनी म्हणाले. 
दिवसेंदिवस नवनवे सायबर गुन्हे पुढे येत आहेत व त्याचा तपास करणे मुष्किलीचे काम होत आहे. मनी लॉंडरिंग, सायबर खंडणी, ट्रिपल करन्सी, बीटकॉन्स यासारखे नवे प्रयोग तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगार करत आहेत. जर 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानच्या माध्यमातून गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करणे शक्‍य झाल्यास त्याचा फायदा तपास यंत्रणेला होऊ शकतो, असे मत पोलिस महासंचालक मुक्‍तेश चंदर यांनी मांडले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Inauguration of International Blockchain Conference in Panaji