
BBC IT Survey : हिंदू सेनेनं BBC ऑफिसबाहेर लावले होते पोस्टर; आठवड्याभरातच झाली छापेमारी
Income Tax Raid In BBC Office : बीबीसी डॉक्युमेंट्रीचा वाद (BBC Documentary Controversy) थांबताना दिसत नाहीये. आवठडाभरापूर्वी हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी राजधानी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील बीबीसी कार्यालयाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बनवलेल्या डॉक्युमेंट्रीवर बंदी घालण्याची मागणी करणारे फलक लावले आहेत.
आता 'बीबीसी'च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आज आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक दिलीये. सुत्रांच्या माहितीनुसार, बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. तसंच कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून घरी जाण्यास सांगण्यात आलंय. बीबीसीच्या लंडनमधील मुख्यालयाला देखील दिल्लीतील कार्यालयाच्या सर्व्हेची माहिती देण्यात आलीये.

केंद्र सरकारनं अलीकडंच ट्विटर आणि यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला India : The Modi Question या माहितीपटाची लिंक ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते. त्याचवेळी परराष्ट्र मंत्रालयानं या डॉक्युमेंट्रीचं वर्णन केवळ अपप्रचार असल्याचं म्हटलं होतं.
तर, दुसरीकडं गेल्या शुक्रवारी हिंदू सेनेनं सरकारला पत्र लिहून भारतात BCC वर बंदी घालण्याची मागणी केली होती. हिंदू सेनेनं बीबीसीवर भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्याचं आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा आरोप केला होता. हिंदू सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता म्हणाले, बीबीसी ही देशाची एकता आणि अखंडतेला धोका आहे. बीबीसीवर तात्काळ बंदी घालावी. यापूर्वीही इंदिरा गांधींनी बीबीसीवर बंदी घातली होती, पण नंतर ही बंदी उठवण्यात आली. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात बीबीसीवर बंदी घातली होती.