कन्नड अभिनेत्यांवर प्राप्तिकर छापे

कन्नड अभिनेत्यांवर प्राप्तिकर छापे

बंगळूर : कन्नड चित्रपटसृष्टीच्या (सॅंडलवूड) इतिहासात पहिल्यांदाच प्रख्यात अभिनेते व चित्रपट निर्माते प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आले आहेत. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी त्यांची निवासस्थाने व कार्यालयावर आज पहाटे छापे घातले. 

अभिनेता शिवराजकुमार, पुनीत राजकुमार, सुदीप, यश, विजय किरंगदुरू, निर्माते रॉकलाईन व्यंकटेश, जयण्णा, सी. आर. यांच्यासह काही अभिनेत्यांची निवासस्थाने व कार्यालयांवर एकाच वेळी 50 ठिकाणी 200 अधिकाऱ्यांच्या पथकांनी छापे घातले. कन्नड चित्रपटसृष्टीतील दिवंगत लोकप्रिय अभिनेते डॉ. राजकुमार यांच्या कुटुंबीयांच्या निवासस्थानावर छापा टाकण्याची ही पहिलीच वेळ होती.

याबाबतचे वृत्त प्रसारित होताच त्यांचे चाहते मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी जमा झाले. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. शिवराजकुमार, पुनीत राजकुमार यांच्यासह इतर अभिनेते व निर्मात्यांच्या घरांसमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. 

पुनीत राजकुमार (सदाशिवनगर), निर्माते व्यंकटेश (महालक्ष्मी लेआऊट), शिवराजकुमार (मान्यता टेकपार्क, नागवार) व सुदीप (जेपीनगर) यांच्या निवासस्थानासह यश यांचे कत्रिगुप्पातील घर व होसकेरेतील कार्यालय, त्यांच्या बहिणाचे निवासस्थान, राधिका पंडित यांच्या वडिलांचे मल्लेश्‍वरममधील निवासस्थान, विजय किरंगदुरू यांच्या नातलगाचे एनजीएफ लेआऊटमधील निवासस्थान आदी ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. 

पुनीत राजकुमार यांच्या निवासस्थानी सापडलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा तपास करण्यासाठी तिघा सुवर्णतज्ज्ञांना बोलाविण्यात आले होते. अभिनेते शिवराजकुमार यांची पत्नी गीता शिवराजकुमार यांच्या मिळकतीची चौकशी महिला प्राप्तिकर अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. शिवराजकुमार यांचा संपूर्ण आर्थिक व्यवहार त्यांच्या पत्नीच पाहतात. 

काळ्या पैशाचा संशय 

काही अभिनेते फायनान्सर व प्रसिद्ध निर्मात्यांमार्फत चित्रपटांत पैशाची गुंतवणूक करतात. तसेच आपला चित्रपट अधिक दिवस चित्रपटगृहात चालावा, यासाठी काळ्या धंद्यात सहभागी होतात. क्रमांक नसलेली तिकिटे विकण्यात येतात, अशी माहिती प्राप्तिकर खात्याला मिळाली होती. याद्वारे प्राप्तिकर खात्याची फसवणूक होत असल्याच्या संशयावरून छापे घातल्याचे समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com