प्राप्तिकर विवरणपत्रांमध्ये दुप्पट वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

प्राप्तिकर विवरणपत्रे न भरणाऱ्या आणि विवरणपत्राशी उत्पन्नाचे स्रोत न जुळणाऱ्या दोन कोटी करदात्यांना याबाबत स्पष्टीकरण देण्याबाबत एसएमएस पाठविण्यात आले आहेत. 

- सुशील चंद्रा, अध्यक्ष, सीबीडीटी 

नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत छाननी वर्ष 2018-19 मध्ये आतापर्यंत दुप्पट वाढ नोंदविण्यात आली आहे. नोटाबंदीमुळे ही वाढ झाल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मंगळवारी दिली. 

याविषयी "सीबीडीटी'चे अध्यक्ष सुशील चंद्रा म्हणाले, ""देशात कर भरणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढण्यास नोटाबंदीमुळे चांगली मदत झाली आहे. या वर्षी 6.08 कोटी प्रप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली आहेत. मागील वर्षातील याच काळातील संख्येच्या तुलनेत यात 50 टक्के वाढ झाली आहे. मागील चार वर्षांत देशातील करदात्यांची संख्या 80 टक्‍क्‍याने वाढली आहे. माहितीची आपोआप देवाणघेवाण करण्याचा करारांतर्गत 70 देशांकडून भारतीयांच्या विदेशातील आर्थिक व्यवहारांसंबंधी माहिती मिळत आहे. नोटाबंदीमुळे कर भरणाऱ्या कंपन्यांची संख्या 8 लाखांवर पोचली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 7 लाख होती.'' 

"महसूल विभाग प्रत्यक्ष कर संकलनाचे 11.5 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट चालू आर्थिक वर्षात पूर्ण करेल, असा विश्‍वास मला आहे. एकूण प्रत्यक्ष कर संकलनातील वाढीचा वेग 16.5 टक्के आणि निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनातील वाढीचा वेग 14.5 टक्के आहे. कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्यास नोटाबंदीमुळे मदत झाली आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष कर संकलन अर्थसंकल्पी उद्दिष्टाच्या 48 टक्के पूर्ण झाले आहे,'' असे त्यांनी नमूद केले. 

चार तासांत मिळेल पॅन

पॅन देण्यासाठी नवी व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. यामुळे आगामी वर्षभरात आधार दिल्यानंतर 4 तासांत ई-पॅन देता येणे शक्‍य होणार असल्याचे चंद्रा यांनी सांगितले. 

Web Title: Income tax returns have doubled