वीस दिवसांत तीन वेळा गोळीबार;अरुणाचलमध्येही चीनच्या कुरापती

वृत्तसंस्था
Thursday, 17 September 2020

लडाखमध्ये ताबा रेषेवरील तणाव लवकर संपण्याची चिन्हे नाहीत.भारतीय जवानांना हिवाळ्यामध्येही या भागांत अधिक सावध राहावे लागणार असून देपसांग भागामध्ये भारतीय लष्कराकडून युद्धपातळीवर भूजलाचा शोध घेतला जात आहे

नवी दिल्ली - भारत आणि चीनदरम्यान ताबा रेषेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, मागील वीस दिवसांच्या काळामध्ये उभय देशांमध्ये तब्बल तीन वेळा गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर लडाखमध्ये चीनने ही आगळीक केली आहे. दुसरीकडे अरुणाचलच्या सीमेवरदेखील चीनने सैन्याची जमवाजमव सुरू केल्याने भारतीय लष्कर सावध झाले आहे.

पँगाँग सरोवराच्या परिसरामध्ये २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना हुसकावून लावताना पहिल्यांदा गोळीबाराचा प्रकार घडला. दुसरी घटना ही ७ सप्टेंबर रोजी मुखपरी शिखरांच्या परिसरामध्ये घडली, गोळीबाराचा तिसरा प्रसंग हा आठ सप्टेंबर रोजी पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील भागामध्ये घडला होता. दोन्ही बाजूंकडून बंदुकीच्या जवळपास शंभर फैरी झाडण्यात आल्या होत्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देपसांगमध्ये भूजलाचा शोध
लडाखमध्ये ताबा रेषेवरील तणाव लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. भारतीय जवानांना हिवाळ्यामध्येही या भागांत अधिक सावध राहावे लागणार असून देपसांग भागामध्ये भारतीय लष्कराकडून युद्धपातळीवर भूजलाचा शोध घेतला जात आहे. दौलत बेग ओल्डी आणि देपसांग परिसरामध्ये यासाठी वेगळी शोधमोहीम राबविली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही भारतीय जवान  आणि भूजलतज्ज्ञ हे या मोहिमेवर काम करत आहेत.

देशातच शस्त्रांची निर्मिती होणार 
चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अन्य देशांकडून शस्त्र खरेदीला वेग दिला असून देशांतर्गत देखील मोठ्याप्रमाणावर शस्त्रांची निर्मिती केली जात आहे. आत्मनिर्भर मोहिमेअंतर्गत आता देशामध्येच ‘प्रॉपल्ड एअर डिफेन्स गन मिसाईल सिस्टिम’ आणि ‘क्लोज क्वार्टर कार्बाईन’ची निर्मिती करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने यासाठी अन्य देशांसोबत झालेले ३ अब्ज डॉलरचे करार रद्द केले आहेत. मागील अनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने हे करार पुढे ढकलण्यात येत होते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दोन्ही देशांदरम्यान गोळीबार
भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची मॉस्कोमध्ये भेट होण्याआधी उभय देशांमध्ये ताबारेषेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या काळामध्ये ताबारेषेवर गोळीबार झाल्याची माहिती उघड झाली आहे. फिंगर-३ आणि ४ या डोंगराळ भागाला जोडणाऱ्या सीमारेषेवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी बंदुकीच्या शंभर ते दोनशे फैरी झाडल्या होत्या, असे एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. मागील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच ही घटना घडल्याचे बोलले जाते. चुशूल सेक्टरमध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लडाखमध्ये बोफोर्स
लडाखच्या सीमांवर भारताने बोफोर्स तोफा तैनात करण्याची तयारी चालविली असून त्यासाठी तोफांची सर्व्हिसिंग देखील केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारगिलच्या युद्धामध्ये पाकिस्तानविरोधात या तोफांचा अधिक सक्षमपणे वापर करण्यात आला होता. चीनला शह देण्यासाठी आता याच तोफा वापरल्या जाणार आहेत असे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India and China over the Line of Control firing three times in the last 20 days