संरक्षणात आत्मनिर्भरतेसाठी पाऊल; शस्त्रांची आयात थांबविणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 10 August 2020

सरकारने संरक्षण साहित्याचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी १०१ उपकरणे, शस्त्र सामग्रीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतीय संरक्षण उद्योगांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. 

नवी दिल्ली - संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करताना भारताने १०१ संरक्षण उपकरणे व शस्त्रांची आयात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तोफा, लघुपल्ल्याची क्षेपणास्त्रे, क्रूज क्षेपणास्त्रे, लढाऊ हेलिकॉप्टर, सैन्य वाहतुकीची विमाने, जेट इंजिने यासारख्या सामग्रीचा समावेश आहे. 

ही आयातबंदी २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. यापुढे या उपकरणांचे उत्पादन भारतातच होईल आणि संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना त्यातून संधी मिळेल. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज एका पाठोपाठ एक अशा ‘ट्विट’मालिकेद्वारे सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संरक्षणमंत्र्यांनी ही घोषणा करताना सांगितले, की संरक्षण मंत्रालय आता आत्मनिर्भर भारत धोरणाच्या मार्गावर वेगाने जाण्यासाठी तयार आहे. सरकारने संरक्षण साहित्याचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी १०१ उपकरणे, शस्त्र सामग्रीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतीय संरक्षण उद्योगांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. 

संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे, की पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत ही १०१ संरक्षण साहित्याची यादी तयार करण्यात आली आहे. 

राम मंदिराची वजनदार घंटा तयार करण्यासाठी लागणार चार महिने

आयात थांबविण्यासाठी निश्चित केलेल्या संरक्षण साहित्याचे देशांतर्गत ठरलेल्या मुदतीत उत्पादन व्हावे यासाठी आग्रह असेल. यासोबतच अन्य संरक्षण उत्पादनांमध्येही स्वयंपूर्णतेसाठी इतर उपकरणांचीही यादी केली जाईल, असेही संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. 

सरकारने २०२०-२१ साठी संरक्षण साहित्य खरेदीचा निधी देशांतर्गत आणि परदेशातून खरेदी अशा दोन भागांमध्ये विभागला आहे. देशांतर्गत खरेदीसाठी यंदा ५२ हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आल्याचेही संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. 

एका अंदाजानुसार हे धोरण लागू झाल्यानंतर पुढील सहा ते सात वर्षात देशांतर्गत संरक्षण साहित्य उत्पादकांकडून चार लाख कोटी रुपयांची खरेदी केली जाईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यांची आयात थांबविणार 
आर्टिलरी गन (तोफा), जमिनीवरून हवेत मारा करणारी लघुपल्ल्याची क्षेपणास्त्रे, जहाजांवरून सोडता येणारी क्रूज क्षेपणास्त्रे, असॉल्ट रायफल, लढाऊ हेलिकॉप्टर, बॅलेस्टिक हेल्मेट, बुलेटप्रुफ जॅकेट, सैन्य वाहतुकीची विमाने, जेट इंजिन या सर्व साहित्याचे भारतातच उत्पादन होईल. पहिल्या टप्प्यात म्हणजे डिसेंबरपर्यंत ६९ उपकरणांची आयात थांबविली जाईल. २०२० ते २०२४ या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही आयात थांबविली जाईल. डिसेंबर २०२१ नंतर व्हिल्ड आर्मर्ड फायटिंग व्हेईकल, लाइट मशिनगन, असॉल्ट रायफल, रणगाडाभेदी भूसुरुंग, ग्रेनेड यासारख्या साहित्याची आयात थांबविली जाईल. तर डिसेंबर २०२४ पर्यंत लहान जेट इंजिनांची आणि डिसेंबर २०२५ पर्यंत लांबपल्ल्याच्या क्रूज क्षेपणास्त्रांची आयातही रोखली जाईल. 

पंतप्रधान उलगडाणार ‘आत्मनिर्भर’चा आराखडा 
आत्मनिर्भर योजनेचा नवा आराखडा पंतप्रधान १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून सर्वांसमोर सादर करतील,अशी माहितीही संरक्षणंत्री राजनाथसिंह यांनी दिली आहे. पंतप्रधानांची ‘आत्मनिर्भर भारत’ योजना आणि महात्मा गांधी यांची ‘स्वदेशी’ची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी प्रत्येक मंत्रालय काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले. क्रांतिकारण उधमसिंग यांना आदरांजली वाहण्यासाठीच्या ऑनलाइन कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india announce ban on 101 defence items