दूध उत्पादनात जगात भारतच "नंबर 1': संयुक्त राष्ट्रसंघ

पीटीआय
मंगळवार, 11 जुलै 2017

अहवालाच्या कालमर्यादेत भारतातील दूध उत्पादनात 49 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन 2026 मध्ये जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश म्हणून ओळखला जाईल. दुसऱ्या क्रमांकावर युरोपीय समुदाय असेल. त्यांच्या पेक्षा एक-तृतीयांश जास्त दूध भारतात उत्पादित होणार आहे

संयुक्त राष्ट्रसंघ, ता.11 (पीटीआय) ः भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र पुढील दशकभरातच सर्वाधिक लोकसंख्या ही भारताची ओळख बनणार आहे. एवढेच नाही तर 2026 पर्यंत जगातील सर्वाधिक दुग्ध उत्पादन भारतात होईल. तसेच गव्हाच्या उत्पादनातही भारताचा क्रमांक वरचा राहील, असे संयुक्त राष्ट्रसंघ व आर्थिक सहकार्य व विकास परिषद (ओईसीडी) यांनी तयार केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

लोकसंख्येनुसार उत्पादन वाढ
"ओईसीडी -एफएओ (अन्न व कृषी संघटना) ऍग्रीकल्चरल आऊटलुक 2017-2026' या अहवालात म्हटले आहे की पुढील दहा वर्षांत जगाच्या लोकसंख्येत 7.3 ते 8.2 अब्ज एवढी वाढ होणार आहे. त्या तुलनेत भारत व आफ्रिकेतील सहारा उपप्रदेशातील लोकसंख्येच्या वाढीचा दर 56 टक्के राहील. एकट्या भारताची लोकसंख्या 1.3 ते 1.5 अब्ज म्हणजेच 15 कोटीने वाढणार आहे. यानुसार लोकसंख्येबाबत चीनला मागे टाकून 2026 पर्यंत भारत जगात प्रथम क्रमांकावर येईल.

दुग्धोत्पादनात 49 टक्के वाढ
वाढत्या लोकसंख्येच्या दरानुसार भारत व सहारा उपप्रदेशातील उत्पादनातही जागतिक पातळीवरही मोठी वाढ होणार असून एकविसाव्या शतकाच्या पहिल्या तिमाहीत भारतातील दूध उत्पादनात जवळजवळ तिपटीने वाढ होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. ""अहवालाच्या कालमर्यादेत भारतातील दूध उत्पादनात 49 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन 2026 मध्ये जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश म्हणून ओळखला जाईल. दुसऱ्या क्रमांकावर युरोपीय समुदाय असेल. त्यांच्या पेक्षा एक-तृतीयांश जास्त दूध भारतात उत्पादित होणार आहे,'' असे अहवालात म्हटले आहे.

भारत गव्हाचे आगार
भारतात गव्हाचे उत्पादनही वाढणार आहे. 2017-26 या काळात जगात गहू उत्पादन 11 टक्‍क्‍याने वाढण्याची शक्‍यता आहे. गहू पिकविणाऱ्या प्रदेशामध्ये केवळ 1.8 टक्के एवढीच वाढ होईल. आशिया व प्रशांत महसागराच्या प्रदेशांमध्ये सर्वाधिक गहू उत्पादन केला जाईल. 46 टक्के जास्तीचे गहू उत्पादन तेथे होईल. या प्रदेशात व जागतिक पातळीवर भारतातील उत्पादनात सर्वाधिक म्हणजे 15 टनाने वाढ होईल. त्यानंतर पाकिस्तान (सहा टन) आणि चीन (5.5 टन) या देशांमधील गहू उत्पादन वाढही उल्लेखनीय असेल.

तांदूळ उत्पादन वाढणार
अहवालात तांदळाच्या उत्पादनाचाही उल्लेख केला आहे. युरोपिय समुदायात आगामी दशकात 13 टक्के उत्पादन वाढीचा शक्‍यता आहे. तांदळाच्या उत्पादनात 66 टनाने वाढ होणार असून ती नेहमीच्या उत्पादनापेक्षा 93 टक्‍क्‍याने जास्त असेल. मात्र जगभरातील भाताखालील शेत जमिनीत एक टक्कात वाढ होणार आहे. जागतिक उत्पन्न मात्र 12 टक्‍क्‍याने वाढेल. भारत, इंडोनेशिया, म्यानमार, थायलंड व व्हिएटनाम हे देश सर्वाधिक उत्पादन करणारे ठरणार असून 15 टक्‍क्‍याने उत्पन्न वाढ होण्याची शक्‍यता आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

जगातील सर्वाधिक दूध उत्पादक पहिले दहा देश ः 1) भारत, 2) अमेरिका, 3) चीन, 4) पाकिस्तान, 5) ब्राझील, 6) जर्मनी, 7) रशिया, 8) फ्रान्स, 9) न्यूझीलंड, 10) तुर्कस्तान

भारतातील सर्वाधिक दूध उत्पादक पहिली दहा राज्ये ः 1) उत्तर प्रदेश, 2) राजस्थान, 3) गुजरात, 4) मध्य प्रदेश, 5) आंध्र प्रदेश, 6) पंजाब, 7) महाराष्ट्र, 8) हरियाना, 9) बिहार, 10) तमिळनाडू.

Web Title: India to become largest milk producer in 2026: Report