रेल्वेचा चिनी कंपनीला 'हायस्पीड' दणका; वंदे भारत गाड्यांच्या निर्मितीचं कंत्राट रद्द 

सकाळ न्यूज नेटवर्क 
Saturday, 22 August 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी या १८ डब्यांच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन केले होते. 

नवी दिल्ली - रेल्वेने चीनला आणखी एक मोठा झटका देताना ‘४४- सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेगाड्या बनविण्याचे कंत्राट रद्द केले आहे. मागील महिन्यातच चीनबरोबर भागीदारी असणाऱ्या सीआरआरसी जेव्ही कंपनीला या प्रकल्पाचा ठेका मिळाला होता.

रेल्वेने चिनी कंपनीचा सहभाग असलेला हा संपूर्ण करारच आता रद्द करण्याचा व पुढील आठवड्यात नव्या नियमांनुसार भारतीय कंपनीला प्राधान्य देण्याची अट असलेले टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

वंदे भारत प्रकल्पासाठी जागतिक टेंडर काढण्यात आली होती व त्या स्पर्धेत फक्त चीनच्या सीआरआरसी कंपनीचाच दावा कसोट्यांवर टिकणारा ठरल्याने त्यांचे टेंडर मंजूर झाले होते. या प्रकल्पांतर्गत ४४- सेमी हायस्पीड रेल्वेगाड्यांची निर्मिती होणार होती व त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. चेन्नईतील इंटग्रियल कोच फॅक्‍टरीमध्ये हे काम होणार आहे. 

हे वाचा - परराज्यात, राज्यांतर्गत प्रवासासाठी कोणतेच निर्बंध घालू नका; केंद्राचे राज्यांना निर्देश

भारतीय कंपनीशी भागीदारी 
सीआरआरसी कार्पोरेशन लिमिटेड ही चीनची सरकारी कंपनी आहे. ही कंपनी गुडगावातील पायोनियर फिल मेड प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीबरोबर भागीदारी करून रेल्वेगाड्यांची निर्मिती करणार होती. आता रेल्वेने हा ठेकाच रद्द केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी या १८ डब्यांच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन केले होते. देशात सध्या २ वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india cancelled Tender For 44 Vande Bharat Trains Chinese Joint Venture