16 तास चाललेल्या चर्चेत भारताने चीनला सुनावलं; 'पूर्व लडाखमधील इतर भागातूनही माघार घ्या'

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 21 February 2021

भारत आणि चीनमध्ये शनिवारी आणखी एक चर्चेची फेरी पार पडली.

नवी दिल्ली- भारत आणि चीनमध्ये शनिवारी आणखी एक चर्चेची फेरी पार पडली. विशेष म्हणजे शनिवारी सकाळी सुरु झालेली ही बैठक रविवारी सकाळी 2 वाजता संपली. चीन आणि भारतामधील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये तब्बल 16 तास चर्चा झाली. चर्चेदरम्यान भारताने पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग, गोगरा आणि देपसांग क्षेत्रातील सैन्य माघार घेण्यावर जोर दिला. दोन्ही देशांनी पैंगोंग त्यो तलावाच्या उत्तर आणि दक्षिणी भागातील सैनिक, शस्त्र आणि अन्य लष्करी उपकरणे हटवले आहेत. त्यानंतर दोन दिवसांनी कोर कमांडर स्तरावर 10 व्या चर्चेची फेरी पाडली. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

इंधन दरवाढीवरुन PM मोदींची केली मीमिक्री; श्याम रंगीलाविरोधात गुन्हा दाखल

पैंगोंग त्सो तलाव क्षेत्रातील सैन्य माघारीची प्रक्रिया 10 फेब्रुवारीला सुरु झाली होती. त्यानंतर गुरुवारी ती पूर्ण झाली. दोन्ही देशांमध्ये शनिवारी झालेल्या 10 व्या चर्चेच्या फेरीचे नेतृत्व लेफ्टिंनेट जनरल पीजीके मेनन यांनी केले. चिनी पक्षाचे नेतृत्त्व मेजर जनरल लिऊ लिन यांनी केले. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

भारत आणि चीनचे सैन्य पैंगोग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यापासून माघार घेतली. या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले होते. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, 24 तारखेला कमांडर स्तरावर झालेल्या चर्चेदरम्यान बनलेल्या सहमतीनुसार दोन्ही देशाच्या सैनिाकांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितलं होतं की, दोन्ही देशांचे सैनिक माघार घेत आहे. भारताने चीनला एक इंचभरही जमीन गमावलेली नाही. सैन्य परत बोलावत असलो, तरी लष्कर सतर्क आहे. 

5 मे रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. त्यानंतर 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. अनेक दशकानंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली होती. संघर्षात दोन्ही देशांना नुकसान झाले होते. भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनचे 40 सैनिक मारले गेले असल्याची माहिती भारत सरकारने दिली होती. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. दुसरीकडे सीमेवर चीनने मोठ्या प्रमाणात सैनिकांची तैनाती केली. भारताने प्रत्युत्तर म्हणून 50 हजार सैनिक सीमेवर तैनात केले. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही सीमेवर आणण्यात आला. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china 10th round meeting stand off army withdrawal from other eastern ladakh parts