चीन विरुद्ध सर्व पर्याय खुले: जनरल बिपीन रावत यांचा इशारा

टीम ई-सकाळ
Monday, 24 August 2020

लडाखमध्ये चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी पूर्वीच्या स्थितीत जावी, यासाठी संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल आणि आम्ही सर्व पर्यायांचा विचार करत आहोत, असं जनरल रावत यांनी स्पष्ट केलंय.

नवी दिल्ली : भारत-चीन सीमाप्रश्न एका वेगळ्या वळणार आहे. चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळं दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला आहे. चीनकडून सातत्यानं होत असलेल्या कुरघोड्यांवर चर्चेतून मार्ग निघाला नाही तर, वेळप्रसंगी सैनिकी कारवाईचा पर्याय स्वीकारू, असा इशारा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी दिलाय. एका इंग्रजी वर्तमानपत्राला जनरल रावत यांनी विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी आपण सर्व पर्यायांचा विचार करत आहोत, असं स्पष्ट केलंय. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले बिपीन रावत?
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राला विशेष मुलाखत दिली. लडाखमध्ये चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी पूर्वीच्या स्थितीत जावी, यासाठी संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल आणि आम्ही सर्व पर्यायांचा विचार करत आहोत, असं जनरल रावत यांनी स्पष्ट केलंय. जनरल रावत म्हणाले, 'प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) अतिक्रमण वेगवेगळ्या उद्देशाने केले जाते. संरक्षण दलांचं काम, अशा प्रकारचं अतिक्रमण रोखणं आणि त्याद्वारे होणारा घुसखोरीचा डाव हाणून पाडणं हे आहे. शांततेच्या मार्गाने प्रत्येक समस्येचं निराकरण व्हावं, अशी सरकारची भूमिका आहे. पण, जर नियंत्रण रेषेवर पूर्वस्थिती तयार होण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत तर, सर्व पर्यायांचा विचार केला जाईल. सैनिकी कारवाईसाठी आम्ही सदैव तयार असतो.'

गुप्तचर यंत्रणांची बैठक सुरूच
देशाच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये ताळमेळ नसतो, असा आरोप होत आहे. जनरल रावत यांनी हा आरोप फेटाळून लावलाय. भारताची सीमा इतकी मोठी आहे की, सातत्याने त्यावर नजर ठेवावी लागते. सध्या देशाच्या गुप्तचर संघटनांची रोज एकत्र बैठक होत असून लडाख आणि इतर ठिकाणची माहिती शेअर केली जात आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चर्चा सुरू, तणाव कायम!
भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या तरी, तणाव कमी होत नसल्याचे दिसत आहे. चीनने एप्रिलच्या आधीच्या स्थितीत जावे, अशी भारताची ठाम भूमिका आहे. सैन्याच्या पातळीवर ही चर्चा सुरू आहेच. पण, परराष्ट्र मंत्रालय आणि इतर पातळ्यांवरही चर्चा सुरू आहे. दोन्ही बाजूने सैन्य मागे घेण्यावर चर्चा झाली आहे. त्याला मान्यताही मिळाली आहे. परंतु, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचं दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India-China border dispute military action is also option general bipin rawat