ड्रॅगनसोबतच्या नव्या संघर्षात भारताच्या एका जवानाचा मृत्यू? चीनने केला खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 2 September 2020

काही दिवसांपूर्वी चिनी सैन्याने भारतात घुसखोरीची आगळीक केली.

नवी दिल्ली- गेल्या शनिवारी (ता. २९) भारत व चीनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या विशेष दलात कार्यरत असलेला एक तिबेटी जवान हुतात्मा झाल्याचा दावा तिबेटच्या विजनवासातील संसदेच्या सदस्या नामग्याल डोलकर लाग्घारी यांनी केला असल्याचे वृत्त काही विदेशी माध्यमांनी दिले आहे. मात्र भारत सरकारने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, असेही त्यात नमूद केले आहे. हा जवान मूळचा तिबेटचा होता, असे लाग्घारी यांनी म्हटले असून याच घटनेत तिबेटचा आणखी एक जवान जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुईंग यांनी मात्र हा दावा आज फेटाळला. भारतीय सीमेवरील नव्या संघर्षात भारताच्या एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

भारताने हिमालयीन प्रदेशातील पश्‍चिम भागातील सीमेवर चीनबरोबर सातत्याने सुरू असलेल्या संघर्षामुळे पूर्वेकडील सीमांवर बंदोबस्त वाढविला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी बुधवारी दिली. जून महिन्यात लडाखमध्ये भारत व चीनच्या सैन्यांत हिंसक झटापट होऊन भारताचे २० जवान हुतात्मा झाले. जवानांनी दाखविलेल्या पराक्रमामुळे चीनची मोठी हानी झाली. या नंतर या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. 

काही दिवसांपूर्वी चिनी सैन्याने भारतात घुसखोरीची आगळीक केली. भारतीय जवानांनी दक्ष राहून हा प्रयत्न हाणून पाडला. या सर्व पार्श्‍वभूमीवर भारताने पूर्वेकडील सीमांवरही जादा कुमक ठेवून पहारा वाढविला आहे. विशेषतः अरुणाचल प्रदेशमधील अज्वा जिल्ह्याच्या पूर्वेकडील सीमेवर बंदोबस्तात वाढ केली आहे.

प्रश्नोत्तराचा तास रद्द करणे ही लोकशाहीची हत्या; विरोधकांची सरकारवर टीका

‘‘पूर्वेकडील भागात लष्कराची कुमक वाढविली असली तरी अचानक हल्ल्याचे कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही, असे अज्वाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी आयुशी सुदान यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. या भागात भारतीय लष्कराच्या अनेक तुकड्या तैनात केल्या आहेत. गलवानमधील संघर्षापासून येथे मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहेच, शिवाय त्याआधीही आम्ही तयारी केली होती, असे त्या म्हणाल्या.

‘चिंतेचे कारण नाही’

भारतीय लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल हर्ष वर्धन पांडे यांनी मात्र चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले. लष्करी तुकड्यांचे येथे तैनात करणे हे कामातील बदलाचा भाग आहे. सैन्यातील केंद्र बदल यातून होत असून असे नियमानुसार हे होत असते, यात विशेष काही नाही, असे ते म्हणाले.

लडाखमधील चौक्या ताब्यात

भारतीय सैन्य दलाने लडाखमधील पेंगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील पर्वतरांगामधील सर्व भागातील ठाणी आणि चौक्या ताब्यात घेतल्या आहेत. ‘‘भारतीय सैन्य चीनच्या सीमेवर दाखल झाले नसले तरी आपल्या सीमेवरील ठाणी ताब्यात घेतली आहे. या भागात आपली बाजू अधिक बळकट केली आहे,’’ अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिल्याचे सांगण्यात आले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china face off one soldier died rumors china explanation