भारत-चीन सीमेवर पुन्हा तणाव; भारतानं सुरू केली तयारी

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 जुलै 2020

सीमा भागात  वाद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनला लागून असलेल्या सीमा भागात अतिरिक्त 35,000 सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली- प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढला असताना भारताने चीनला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी चालवली असल्याचं दिसत आहे. सीमा भागात  वाद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनला लागून असलेल्या सीमा भागात अतिरिक्त 35,000 सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लूमबर्गने वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. 

चीनसोबत असलेल्या 3,488 किलोमीटरच्या सीमाभागात असलेली सध्याची स्थिती बदलली जाणार आहे. भारत आणि चीनमध्ये लष्करी स्तरावर चर्चा सुरु आहे. लवकरच दोन्ही देशांमध्ये चर्चेची पाचवी फेरी पार पडणार आहे. दोन्ही देशांनी सीमा भागातून सैन्य मागे घेण्याचे मान्य केले आहे. मात्र, चीनने काही भागातून सैन्य मागे घेतले आहेत, तर काही भागातून चीन मागे जाण्यास टाळाटाळा करत आहे. या पार्श्वभूमीवर उभय देशातील संबंध बिघडत असून भारत अधिकचे 35 हजार जवान सीमा भागात तैनात करणार आहे. 

चीन लडाखमध्ये मोठ्या संघर्षाची करतोय तयारी; सॅटेलाईट फोटोंमधून उघड
15 जून रोजी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनने आपल्या जवानांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले होते, पण मृत सैनिकांचा आकडा जाहीर करण्यास नकार दिला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध स्फोटक बनले आहेत. उभय देशांनी सीमा भागात मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले आहेत. शिवाय शस्त्रास्त्रांची आवकही सीमा भागात वाढवण्यात आली आहे. अशात परिस्थिती सुधारत नसल्याने निर्माण होणाऱ्या संघर्षाचा सामना करण्यासाठी भारत तयारी करत आहे.

भारत आतापर्यंत पाकिस्तान सीमेवरच जास्त लक्ष देत होता. मात्र आता भारताला चीन सीमेवरही लक्ष द्यावं लागत आहे. चीन सीमेवर भारताने मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले आहेत. त्यामुळे भारतीय संरक्षण बजेटवर याचा प्रभाव पडणार आहे. सुरक्षा बजेटचा एकूण 60 टक्के हिस्सा वेतन आणि पेंशनसाठी दिला जातो. भारत हा आपल्या सैन्यावर सर्वाधिक खर्च करणार तिसरा देश आहे.  चीनसोबत निर्माण झालेल्या वादामुळे भारताला संरक्षण बजेट वाढवावे लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. 

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 15.83 लाखांवर तर मृतांची संख्या...
दरम्यान, चीननेही संघर्षाची तयारी केली आहे. पूर्व लडाखमध्ये भारताची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करणारा चीन पैंगोग त्यो झीलच्या फिंगर 4 ते 8 या भागातून मागे हटण्यास तयार नाही. चीनने लडाखच्या काही भागातून माघार घेतली आहे. मात्र, मोठ्या संघर्षासाठी चीन एलसीपासून काही दूर असणाऱ्या अक्साई चीन भागात मोठी सैन्य तयारी करत आहे. चीन आपल्या सैतुला सैन्य ठिकाणाला आधुनिक बनवत आहे. तसेच येथे घातक शस्त्र तैनात करत असल्याचं उपग्रह छायाचित्रांमधून स्पष्ट होत आहे.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china faceoff india start preparation on china border