esakal | महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू, देशात आढळले साडेतीन लाख रुग्ण

बोलून बातमी शोधा

Corona Death

सलग चौथ्या दिवशी तीन लाखाहून कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू, देशात आढळले साडेतीन लाख रुग्ण
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

Corona Updates : नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीची स्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. दररोज नव्याने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगवेगळे रेकॉर्ड बनवत आहे. भारतात शनिवारी (ता.२४) दिवसभरात ३ लाख ४९ हजार ६९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ६९ लाख ६० हजार १७२ एवढी झाली आहे.

सलग चौथ्या दिवशी तीन लाखाहून कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. सध्या देशात २६ लाख ८२ हजार ७५१ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात २ लाख १७ हजार ११३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखाहून अधिकजणांना घरी पाठविण्यात आलं आहे. आतापर्यंत १ कोटी ४० लाख ८५ हजार ११० रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी दिवसभरात २ हजार ७६७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा १ लाख ९२ हजार ३११ वर पोहोचला आहे.

हेही वाचा: नाकावाटे दिली जाणार लस, जाणून घ्या भारत बायोटेकच्या लसीबद्दल

कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १४ कोटी ९ लाख १६ हजार ४१७ जणांना लसीकरण करण्यात आलं आहे. शनिवारी दिवसभरात १७ लाख १९ हजार ५८८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. देशात आतापर्यंत २७ कोटी ७९ लाख १८ हजार ८१० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात ७७३ दिल्लीत ३४८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात सर्वाधिक ७७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राजधानी दिल्लीत ३४८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही कोरोनाच्या नव्या रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढू लागली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या ७४.१५ टक्के रुग्ण वरील सर्व राज्यांमध्ये आहेत.