esakal | कोरोना मृतांनी ओलांडला २ लाखांचा टप्पा; भारत जगातील चौथा देश

बोलून बातमी शोधा

कोरोना तपासणी
कोरोना मृतांनी ओलांडला २ लाखांचा टप्पा; भारत जगातील चौथा देश
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नवी दिल्ली - भारतात कोरोनामुळे गेल्या 24 तासात मृ्त्यू झालेल्यांची संख्या 3 हजारांच्या वर गेली असून आतापर्यंत एकूण 2 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने 2 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेला भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. देशात आतापर्यंत 2 लाख 1 हजार 187 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. अमेरिकेत हीच संख्या 5 लाख 87 हजार, ब्राझीलमध्ये 3 लाख 95 हजार तर मेक्सिकोत 2 लाख 15 हजार इतकी आहे.

मंगळवारी दिवसभरात 3 लाख 60 हजार 960 नवीन रुग्ण आढळले. तर 3 हजार 293 जणांचा मृत्यू झाला. एका बाजुला कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. गेल्या 24 तासात 2 लाख 61 हजार 162 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाने दिली. आतापर्यंत देशात 1 कोटी 79 लाख 97 हजार 267 कोरोनाबाधित सापडले आहेत. यापैकी 1 कोटी 48 लाख 17 हजार 371 जण कोरोनामुक्त झाले तर 2 लाख 1 हजार 187 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या 29 लाख 78 हजार 709 इतकी आहे.

देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून मंगळवारी राज्यात 66 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. याआधी सोमवारी 48 हजार कोरोनाबाधित सापडले होते. केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासात 30 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. उत्तर प्रदेशात 32 हजार 921, केरळमध्ये 32 हजार 819 तर कर्नाटकात 31 हजार 830 नवीन रुग्ण आढळले.

हेही वाचा: मोठी बातमी : भारत बायोटेक महाराष्ट्राला देणार ८५ लाख डोस!

कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढले असून आतापर्यंत देशात 28 कोटी 27 लाख 3 हजार 789 जणांची चाचणी झाली आहे. मंगळवारी दिवसभरात 17 लाख 23 हजार 912 जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम सुरु आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. मात्र, राज्यांकडे लस नसल्यानं लसीकरण मोहिम राबवायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.