esakal | तिसऱ्या लाटेची टांगती तलवार
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

``तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सरकारने केली आहे,’’ असे पंतप्रधान मोदी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सांगत आहेत.

तिसऱ्या लाटेची टांगती तलवार

sakal_logo
By
विजय नाईक,दिल्ली

देशभर सध्या करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून, ती अनिवार्य आहे, असे सांगितले जात आहे. ``लोकांनी करोनाच्या नियमांचे पालन केले, तर तिला बऱ्याच प्रमाणात आपण थोपवू शकू,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शास्त्रज्ञ व तज्ञ डॉक्टर्स सुचवित आहेत. काही दिवसांपूर्वी दुसरी लाट जशी ओसरू लागली, तसे प्रत्येक राज्याने नियम शिथिल करून बाजारपेठा खुल्या केल्या. पुढच्या दिवसापासूनच बाजारपेठात गर्दी होऊ लागली. उन्हाळ्यामुळे लोकांनी गाड्या काढून वा मिळेल ते वाहन घेऊन थंड हवेच्या स्थळांकडे पळ काढला, तो इतका, की रस्ते गाड्यांनी इतके भरले, की एकही वाहन पुढे सरकेना. पुढे राज्यांना वाहनबंदी करण्याची वेऴ आली. परंतु, एव्हाना सिमला, नैनिताल, मसूरी या ठिकाणी पर्यटकांनी केलेल्या गर्दीची छायाचित्रे सर्वत्र दिसू लागली. त्यात करोनाकालीन कोणताही नियम पाळलेला नव्हता, त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होणार, याची खात्रीच झाली. दिल्लीतही करोलबाग, सरोजनी नगर, लाजपत नगर आदी सुरू झालेल्या बाजारपेठा पुन्हा बंद करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला.

``तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सरकारने केली आहे,’’ असे पंतप्रधान मोदी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सांगत आहेत. त्याचबरोबर, लोकांना मास्क घालणे, विशिष्ट अंतर ठेवणे व हात स्वच्छ धुणे, हे सामान्य नियम पाळण्यास वारंवार सांगितले जात आहे. तरीही लोक ते पाळत नाहीत, असेच दिसून येत आहे. म्हणूनच, तिसरी लाट आली, तर त्याचा दोष पुर्णपणे दुसऱ्या लाटेसारखा सर्वस्वी सरकारवर ढकलता येणार नाही. या लाटेची शक्यता पुन्हा महाराष्ट्र, केऱळ या राज्यातून अधिक दिसते आहे. बृहनमुंबई महानगरपालिकचे आयुक्त इकबालसिंग चहल यांनी करोनावर अत्यंत कार्यक्षमतेने नियंत्रण केल्याने त्याचे नाव देशात झाले. तथापि, अऩ्य शहरात तसे झाले नाही. दिल्लीत एक नसून दोन सरकारे आहेत. त्यांनी व्यवस्थापनाचा दोष एकमेकांवर लादून जनतेची ससेहोलपट केली.

हेही वाचा: देशात दिवसभरात 41 हजार 383 नवे रुग्ण; 507 मृत्यू

एका गोष्टीबाबत समाधान व्यक्त करावे लागेल, ती म्हणजे कुंभमेळा आयोजित करणाऱ्या उत्तराखंड सरकारने डोके ठिकाणावर ठेऊन यंदाची कावड यात्रा बंद केली. या संदर्भात उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांना मार्क द्यावे लागतील. दिल्लीनेही तिला प्रतिबंध केला. परंतु, उत्तर प्रदेशच्या उद्दाम सरकारने तिला सम्मती दिल्याने अखेर सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून यात्रा थांबवावी लागली. शंकराला गंगेच्या पाण्याचा अभिषेक करण्याच्या उद्देशाने कावरिया (भगवे कपडे परिधान केलेले तरूण) हरिद्वार, गौमुख, गंगोत्रीहून कावडीमध्ये पाणी भरून भोले बाबाला बागपतमधील पुरमहादेव मंदिरात जलाअभिषेक करतात. त्यासाठी ते अंदाजे दोनशे कि.मी. चा पायी प्रवास करतात. यात्रेचा संबंध पुराणाच्या त्रेता युगातील समुद्र मंथनाशी आहे. त्यातून अमृत बाहेर येण्याआधी विष आले, तेव्हा पृथ्वी त्यापासून निर्माण झालेल्या आगीपासून जळू लागली. महादेवानं पृथ्वीला वाचविण्यासाठी विषाचे प्राशन केले. त्याचा शंकराला दाह होऊ लागला. तेव्हा महादेवभक्त रावणाने घोर तपस्या केली व कावडीने गंगेचे पाणी आणून पुरमाहदेव (बागपत) देवालयात जलाभिषेकाचा वर्षाव केला. त्यातून महादेवाच्या शरीराची आग शमली. ही पौराणिक परंपरा आता कावडिया चालवित आहेत. गेल्या वर्षी कावड भरावयास गेलेल्या कावडियांची संख्या पावणे चार कोटी होती. यावरून एक गोष्ट ध्यानात येते, की इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्तराखंड, दिल्ली व उत्तरप्रदेशातून कावडिया आले असते, तर करोनाची तिसरी लाट पसरण्यास वेळ लागला नसता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला आदेश काढावे लागले.

हेही वाचा: इतर राज्यातील पुरुषालाही होता येणार जम्मू-काश्मिरचा रहिवाशी

धर्मापुढे प्रत्येक राजकीय पक्ष लोटांगण घालताना दिसतो. काँग्रेस असो, भाजप असो की देवाला न मानणारे कम्युनिस्ट असो. कम्युनिस्टांचे ताजे उदाहरण म्हणजे केरळ सरकार होय. तेथे मुसलमानांच्या बकरी इद या महोत्सवासाठी सरकारने सूट दिली असून, आधीच करोनाची अधिक बाधा झालेल्या राज्यात त्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत, दिलेली सूट अत्यंत धोकादायक आहे, असे म्हटले आहे. शनिवारी एका दिवसात केरळमध्ये करोनाच्या 16 हजार 148 नव्या लागणीची नोंद झाली. ती सर्वाधिक आहे. ``परिस्थिती चिंताजनक आहे,’’ असे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी म्हटले आहे. ते बकरी ईदच्या सणावर बंदी का घालू शकले नाही?

आजवर 40 कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असले, तरी दोन डोस मिळालेल्यांचे प्रमाण केवळ 8 टक्के आहे. याचा अर्थ देशापुढे आजही फार मोठे आव्हान आहे. लसींची कमतरता नाही, असे एकीकडे केंद्र सांगते, तर दुसरीकडे लस उपलब्ध नसल्याने राज्याराज्यातून लसीकरण केंद्र बंद करण्यात येत आहेत, अशा बातम्या येत आहेत. सर्वावर कढी म्हणजे, ``प्राणवायूच्या तुटवड्यामुळे करोनाचे मृत्यू झाल्याचा इन्कार राज्य सरकारे करीत आहेत,’’ असे केंद्रातर्फे जाहीर करण्यात आलेली बाब. संसदेमध्ये आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी उत्तर त्या संदर्भात उत्तर दिले.

हेही वाचा: PM मोदींकडून इम्रान खान यांच्यावर पाळत? पाकिस्तानला संशय

दुसऱ्या लाटेदरम्यान, रोज टीव्ही पडद्यावर राज्याराज्यातून प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यातून मरण पावलेल्या रूग्णांचा आखोदेखा हाल देश पाहात होता. तरही पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तम काम केल्याबद्दल त्यांना जाहीर शाबासकी दिली आहे. दुसऱ्या लाटेबाबत प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, भारतात लागण झालेल्यांची संख्या 2 कोटींपेक्षा अधिक आहे. या लाटेत 2 लाख 56 हजार 931 मृत्यूंची नोंद झाली. रविवार (18 जुलै) अखेर 2.7 लाख नव्या केसेसची नोंदणी झाली. ही आकडेवारी वाचूनही लोकांचे करोना प्रतिबंधक वर्तन सुधारणार नसेल, तर सर्वांना पुन्हापुन्हा टाळेबंदीला सामोरे जावे लागेल, यात शंका नाही.

loading image