कोरोनाने वाढवलं पंतप्रधान मोदींचे टेन्शन

pm modi
pm modi

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या गतवर्षीप्रमाणेच वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 मार्चला सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबत चर्चा करतील. ही बैठक व्हर्च्यअल असणार आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मोदी ही बैठक घेत आहेत. 

गेल्या आठवड्यात म्हणजेच 8 ते 15 मार्च या कालावधीत मृत्यूच्या संख्येतही 28 टक्के वाढली आहे. गेल्या सहा आठवड्यात ही आकडेवारी सर्वाधिक आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 26 हजार 291 रुग्ण सापडले आहेत. जे गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक आहेत. याआधी पहिल्यांदा डिसेंबरमध्ये यापेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. याशिवाय 17 हजार 455 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 118 जणांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असून गेल्या 24 तासात 16 हजार 620 रुग्ण सापडले आहेत. याआधी राज्यात 30 सप्टेंबरला इतके रुग्ण आढळले होते. याशिवाय इतर सहा राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. पंजाबमध्ये दीड हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर कर्नाटकात 934 रुग्ण आढळले असून त्यात 628 फक्त बेंगळुरूतील आहेत. गुजरातमध्येही 810 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 27 डिसेंबरनंतर ही संख्या सर्वाधिक आहे. तामिळनाडुत 759, मध्य प्रदेशात 743, आंध्र प्रदेशात 298, पश्चिम बंगालमध्ये 283 तर राजस्थानात 250 रुग्ण आढळले आहेत.  8 ते 15 मार्च या कालावधीत त्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास 38 हजार 714 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 7 ते 13 सप्टेंबरनंतर आठवड्याला आढळणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

संथ लसीकरणामुळे चिंता 
भारतात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांनतर 60 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आतापर्यंत देशात जवळपास तीन कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, गृह मंत्रालयावरील संसदेच्या स्थायी समितीने लसीकरणाचा देशातील वेग संथ असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत एक टक्क्याहून कमी लोकसंख्येचे लसीकरण झाले असून या वेगाने संपूर्ण लोकसंख्येच्या लसीकरणासाठी कित्येक वर्षे लागतील. दुसऱ्या डोसला असंख्य लोकांना मुकावे लागू शकेल, असे राज्यसभेत सोमवारी सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com