भारतात 3 सप्टेंबरला कोरोना रुग्ण गाठणार उच्चांक, रिपोर्टमध्ये समोर आली आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जुलै 2020

जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राष्ट्रांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात 28 जुलैपर्यंत कोरोनाचे 14.83 लाख रुग्ण आढळले आहेत.

नवी दिल्ली - भारतात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 15 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली असून 3 सप्टेंबरपर्यंत देशात 9.86 लाख कोरोनाचे सक्रीय रुग्ण असतील अशी माहिती Times Fact-India Outbreak Report मध्ये देण्यात आली आहे. यामध्ये ‘most likely’ आणि SEIR मॉडेलनुसार आकडेवारी देण्यात आली आहे. SEIRनुसार 1 सप्टेंबरला दहा लाख 15 हजार कोरोनाचे सक्रीय रुग्ण असतील असं सांगितलं जात आहे. रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आकडेवारी आणि त्याचे विश्लेषण Times Fact-India Outbreak Report ने केलं आहे. यासाठी डाटा रिसर्च फर्म Protiviti आणि Times Network यांचीही मदत घेण्यात आली होती. 

जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राष्ट्रांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका आणि ब्राझिल हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहे. भारतात 28 जुलैपर्यंत कोरोनाचे 14.83 लाख रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सध्या 4 लाख 97 हजार रुग्णांवर उपचार सुरू असून 33 हजार 425 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

हे वाचा - कोरोना महामारीमुळे 10 कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या संकटात

भारतात ‘most likely’ मॉडेलनुसार 3 सप्टेंबरला सर्वाधिक 9 लाख 85 हजार 643 इतके सक्रीय रुग्ण असतील तर SEIR मॉडेलनुसार दोन दिवस आधीच 1 सप्टेंबरला देशात 10 लाख 15 हजार 231 कोरोनाचे सक्रीय रुग्ण असतील.  देशात दिल्लीने कोरोनाच्या परिस्थितीवर कमालीचे नियंत्रण मिळवलं आहे. तर मुंबईतील परिस्थितीही सध्या सुधारत आहे. याव्यतिरिक्त बेंगळुरू, पुणे या हॉटस्पॉटवर कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.

भारतात महाराष्ट्राला सर्वाधिक कोरोनाचा फटका बसला आहे. सर्व्हेनुसार ‘most likely’ मॉडेलनुसार महाराष्ट्रात 14 ऑगस्टला 1.92 लाख सक्रीय रुग्ण असतील. तर SEIR मॉडेलनुसार त्याच दिवशी राज्यात 2 लाखांचा आकडा गाठण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्राशिवाय तामिळनाडुतही कोरोनाचा कहर आहे. तामिळनाडुत 24 ऑगस्टला ‘most likely’ मॉडेलनुसार 68 हजार 708 सक्रीय रुग्ण तर SEIR नुसार याच दिवशी 76 हजार 144 रुग्ण असतील असं म्हटलं आहे. 

हे वाचा - भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीये; पण...

दिल्ली आणि मुंबईनंतर पुणे आणि बेंगळुरूत कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. यात पुण्यामध्ये 10 ऑगस्टला ‘most likely’ मॉडेलच्या आकडेवारीनुसार कोरोनाचे 60 हजार सक्रीय रुग्ण असतील तर SEIR नुसार 69 हजार 427 सक्रीय रुग्ण असतील. या तुलनेत बेंगळुरूत सक्रीय रुग्णांची संख्या कमी असेल. 15 ऑगस्टला बेंगळुरुत कोरोना रुग्णांचा उच्चांक गाठेल. यानुसार 46 हजार ते 51 हजार सक्रीय रुग्ण असतील असंही या सर्वेमध्ये म्हटलं आहे. 

हे वाचा - कोरोनाच्या लसीसंदर्भात मोठी बातमी!

काय आहे Times Fact-India Outbreak Report
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गरज भासेल त्याठिकाणी लॉकडाऊनही करण्यात येत आहे. दरम्यान, काही प्रश्नही उपस्थित होत आहे. कोरोना व्हायरसचा हा चढता आलेख कधीपर्यंत असाच वाढेल? हा थांबणार कधी आणि कोणत्या शहरांमध्ये, राज्यात कशी परिस्थिती असेल? अशा प्रश्नांची उत्तरे डाटा रिसर्च आणि आकडेवारीच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न टाइम्स फॅक्ट इंडिया आउटब्रेक रिपोर्टमध्ये कऱण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीचा वापर करून रिपोर्ट तयार केला असून त्याच्याआधारे देशात, राज्यात आणि कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कशी परिस्थिती असेल याचा अंदाज काढण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india covid outbreak report country peak on september 3 in active cases