esakal | देशात 4 मिनिटाला होतेय एक आत्महत्या, कौटुंबिक समस्या प्रमुख कारण
sakal

बोलून बातमी शोधा

india every 4 minute finishes their  lives family problem is main cause

भारतात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात नोंदवल्या गेल्या आहेत. त्यानंतर तामिळनाडु, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, कर्नाटक यांचा क्रमांक लागतो.

देशात 4 मिनिटाला होतेय एक आत्महत्या, कौटुंबिक समस्या प्रमुख कारण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - जगभरात 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन म्हणून साजरा केला जातो. जगात दरवर्षी जवळपास 8 लाख आत्महत्या होतात म्हणजेच दर 40 सेकंदाला कुणी ना कुणी टोकाचं पाऊल उचलतो. भारतातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. दरवर्षी भारतात एक लाखाहून अधिक लोक आत्महत्या करतात. आता भारतातील 2019 मध्ये झालेल्या आत्महत्येच्या आकडेवारीतून धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. देशात 2019 मध्ये दिवसाला सरासरी 381 आत्महत्या झाल्या म्हणजेच जवळपास चार मिनिटाला एक व्यक्ती भारतात आत्महत्या करते. 

आत्महत्येची कारणं, वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्मचारी, वेगळ्या वयोगटातील लोकांच्या आत्महत्येची आकडेवारी एनसीआरबीने प्रसिद्ध केली आहे. भारतात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात नोंदवल्या गेल्या आहेत. त्यानंतर तामिळनाडु, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, कर्नाटक यांचा क्रमांक लागतो. या पाच राज्यातच भारतातील एकूण आत्महत्यांपैकी 50 टक्के आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रीतील आत्महत्येचं प्रमाण 13.6 टक्के इतकं आहे.  

आत्महत्येमागे प्रमुख कारणे
आत्महत्या करण्यामागे कौटुंबिक समस्या आणि आजारपण ही दोन मुख्य कारणं आहेत. कुटुंबातील अडचणींमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण 32.4 टक्के तर आजाराला कंटाळून जीवन संपवणाऱ्यांचे प्रमाण 17.1 टक्के इतकं आहे. याशिवाय वैवाहीक समस्या, प्रेम प्रकरण, फसवणूक, अपयश, बेरोजगारी, व्यावसायिक अडचणी, मालमत्तेचा वाद या कारणांवरूनही आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. आर्थिक परिस्थितीच्या आधारे आत्महत्येची आकडेवारी पाहिली असता 1 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांचे प्रमाण 65 टक्के आहे. तर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांचे प्रमाण 29.6 टक्के इतकं आहे. 

वर्षभरात 10, 281 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
गेल्या वर्षभरामध्ये 10,281 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यामध्ये 5 हजार 957 शेतकरी आणि उत्पादक तसेच 4 हजार 32 शेतमजुरांचा देखील समावेश आहे. देशात 1 लाख 39 हजार 123 आत्महत्या झाल्या त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण हे 7.4 टक्के एवढे आहे, त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण हे 7.7 टक्के एवढे होते, असे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 

पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 2019 मध्ये झालेल्या एकूण आत्महत्यांपैकी 70.2 टक्के पुरुष तर 29.8 टक्के महिला होत्या. 2018 च्या तुलनेत पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. 2018 मध्ये केलेल्या आत्महत्येपैकी 68.5 टक्के पुरुष आणि 31.5 टक्के महिला होत्या.