esakal | भारताच्या चुकीच्या नकाशाबाबत WHOवर नाराजी; त्वरित दुरुस्तीसाठी सरकारचं पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

tedros adhonom

जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या वेबसाईटवर सातत्याने भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी भारत सरकारने आता कडक भुमिका घेतली आहे.

भारताच्या चुकीच्या नकाशाबाबत WHOवर नाराजी; त्वरित दुरुस्तीसाठी सरकारचं पत्र

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या वेबसाईटवर सातत्याने भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी भारत सरकारने आता कडक भुमिका घेतली आहे. याबाबत सरकारने WHO चे डायरेक्टर जनरल टेड्रोस अधनोम घेब्रेसेस यांना म्हटलंय की वेबसाईटवर असलेल्या भारताच्या नकाशाला सुधारित नकाशाने तातडीने बदलावं. भारताने एका महिन्यात तिसऱ्यांदा हे पत्र पाठवलं आहे. याआधी 3 आणि 30 डिसेंबर रोजी WHO च्या प्रमुखांच्या ऑफिसला पत्र पाठवलं होतं. यामध्ये म्हटलं होतं की, कोरोना व्हायरसच्या परिस्थितीला दाखवणाऱ्या डॅशबोर्डसहित व्हिडीओज आणि नकाशामध्ये भारताच नकाशा चुकीचा दाखवला जात आहे. यामध्ये वास्तवातील सीमांना चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे.  याबाबतची बातमी 'हिंदूस्थान टाइम्स'ने दिली आहे. 

मागच्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी इंद्र मणी पांडे यांनी टेड्रोस यांच्या समोर याबाबत हरकत घेतली आहे. या पत्रात ते म्हणतात की, मी WHO च्या वेगवेगळ्या पोर्टल्सवरील नकाशांमध्ये भारताच्या सीमांना चुकीच्या पद्धतीने दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहत आहे. 

हेही वाचा - समितीच्या निष्पक्षतेवर शंका; शरद पवारांनी सरकारला दिला तटस्थ सदस्य निवडण्याचा सल्ला

WHO ने भारताच्या नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाखला देशापासून वेगळं झालेलं दाखवलं होतं. 5168 स्क्वेअर किमीमध्ये पसरलेल्या शक्सगाम व्हॅलीला 1963 मध्ये अवैधरित्या पाकिस्तानद्वारे चीनला सोपवलं गेलं होतं. या भागाला नकाशामध्ये चीनचा भाग दाखवण्यात आलं आहे. तर 1954 पासून चीनच्या ताब्यात असणाऱ्या अक्साई चीनच्या भागाला फिकट निळ्या रंगामध्ये दाखवलं गेलं आहे.  भारताच्या नकाशाला चुकीच्या पद्धतीने प्रकाशित करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे, ज्याअंतर्गत सहा महिन्यांचा तुरुंगवास तसेच दंड होऊ शकतो. 

यासंबंधी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने म्हटलंय की, WHO कडून कोरोना परिस्थितीला दाखवण्यासाठी भारताचा चुकीचा नकाशा दाखवणे दुर्दैवी आहे. त्यांनी म्हटलंय की भारत सरकार  WHO आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधेल जेणेकरुन नकाशात योग्य बदल केले जातील.