Breaking - पबजीसह 118 चिनी Apps वर बंदी; भारत सरकारची मोठी कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

चीन आणि भारत यांच्यात सीमेवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आता मोठं पाऊल उचललं आहे.

नवी दिल्ली - चीन आणि भारत यांच्यात सीमेवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आता मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने मोठी कारवाई करताना पबजीसह 118 अप्सवर बंदी घातली आहे. याआधी भारताने 57 चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यामध्ये टिकटॉक, शेअर इट या अॅप्सचा समावेश होता. आता नवीन बंदी घातलेल्या अॅपमध्ये पबजी मोबाइल लाइट, वी चॅट वर्क अँड वीचॅट रिडिंग यांसारख्या अॅप्सचा समावेश आहे. 

 चीनसोबतच्या वादानंतर  Apps वर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने टिकटॉकसह 47 अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलैच्या शेवटी 59 अॅप्सवर बंदी घातली. सरकारने या कारवाईमागे राष्ट्रीय सुरक्षा असल्याचं कारण दिलं होतं. 

नव्याने बंदी घालण्यात आलेल्या अॅपमध्ये अनेक लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. यात पब जी मोबाईल, पब जी मोबाईल लाइट, बायडू, सुपर क्लीन, शाओमीचं शेअर सेव्ह, वीचॅट वर्क, सायबर हंटर, गेम ऑफ सुल्तान, गो एसएमएस प्रो, मार्व्हल सुपर वॉर इत्यादी अॅप्स आहेत. 

हे वाचा - कोरोनाचा अधिवेशनावरही परिणाम; पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात बदल

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, PUBG शिवाय  Baidu,APUS लाँचचर प्रो यावरही बंदी घातली आहे. जून महिन्यात भारताने चीनच्या 47 अॅप्सना दणका दिला होता. त्यामध्ये ShareIt, UC Browser, Shein, Club Factory, Clash of Kings, Helo, Mi Community, CamScanner, ES File Explorer, VMate या अॅप्सचा समावेश होता. त्यानंतर आणखी एकदा सरकारने चिनी अॅपवर बंदी घालून दणका दिला होता. सरकारने चिनी अॅप्सवर बंदी घालताना म्हटलं होतं की, संबंधित अॅप्सकडून डेटा चोरी, संशयास्पद माहितीची देवाण घेवाण तसंच देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्यानं कारवाई करण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india government banned 118 china apps including pub g