esakal | Fact Check - भारतात 1 डिसेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन होणार असा व्हायरल मेसेजमध्ये दावा
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला तरी धोका कायम आहे. देशात दररोज 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधित सापडत आहे. 

Fact Check - भारतात 1 डिसेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन होणार असा व्हायरल मेसेजमध्ये दावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला तरी धोका कायम आहे. देशात दररोज 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधित सापडत आहे. देशातील परिस्थिती सुधारली असली तरी काही राज्यांमध्ये मात्र संसर्ग वाढत आहे. दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका आहे असा इशाराही दिला आहे. बेजबाबदारपणा आणि वायु प्रदुषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 

देशातील कोरोनाचं वाढतं संकट आणि दुसऱ्या लाटेची शक्यता या गोष्टींमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार अशी चर्चा होत आहे. युरोपात काही देशांनी पुन्हा लॉकडाऊन केल्यानं भारतातही असंच होणार असा दावा केला जात आहे. त्यातच सोशल मीडियावरही देशात 1 डिसेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन लागू केलं जाऊ शकतं असा मेसेज फॉरवर्ड होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने केली आहे. यामध्ये पीआयबीने म्हटलं की, भारतात पुन्हा लॉकडाऊन करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. 

मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून सरकार 1 डिसेंबरपासून पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन करण्याची तयारी करत आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने हा मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट केलं असून सरकार असा कोणताही विचार करत नसल्याचं म्हटलं आहे. अशा खोट्या मेसेजपासून सावध राहण्याचा सल्लाही पीआयबीने दिला आहे. 

हे वाचा - ट्विटरने हटवला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा प्रोफाइल फोटो

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. इंग्लंडमध्ये असलेला दुसरा लॉकडाऊन 2 डिसेंबरपर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे. 

भारतात एका दिवसात कोरोनाचे 47 हजार 905 नवे रुग्ण समोर आले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 86 लाख 83 हजार 916 इतकी झाली आहे. तर देशात आतापर्यंत 80 लाख 66 हजार 501 रूग्ण बरे होऊन घऱी परतले आहेत.

loading image
go to top